3 ऱ्या कार्यकाळात मोफत विजेचे लक्ष्य; उत्तराखंडमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
: मागील 10 वर्षांमधील विकास हा केवळ ट्रेलर
वृत्तसंस्था/ रुद्रपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी काँग्रेसवर निशाणा साधत भाजप लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी तिसऱ्या कार्यकाळात मोफत वीज पुरविण्याचे लक्ष्य असल्याची घोषणा केली आहे. उत्तराखंडच्या रुद्रपूर येथे पंतप्रधान मोदींची जाहीर सभा झाली आहे.
मोदीच्या गॅरंटीने उत्तराखंडच्या घरोघरी सुविधा पोहोचविली आहे, लोकांचा स्वाभिमान वाढविला आहे. आता तिसऱ्या कार्यकाळात तुमचा हा पुत्र आणखी एक मोठे काम करणार आहे. सर्वांना 24 तास वीज मिळावी, विजेचे बिल शून्य असावे आणि विजेद्वारे कमाई व्हावी याकरता मोदीने ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू केली असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
मागील 10 वर्षांमध्ये झालेला विकास हा केवळ ट्रेलर आहे. अद्याप खूप काही करायचे आहे. अजून आम्हाला देशाला खूप पुढे न्यायचे आहे. तोपर्यंत थांबणार नाही आणि थकणार देखील नाही. मोदी हा मौज करण्यासाठी जन्माला आलेला नाही. मोदी मेहनत करण्यासाठी जन्मला आहे. मोदीच गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. हे दशक उत्तराखंडचे दशक ठरणार आहे असे उद्गार पंतप्रधानांनी जाहीर सभेत काढले आहेत.
आम्ही भारताला जगाची तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती करण्याची गॅरंटी दिली आहे. तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्तीचा अर्थ लोकांचे उत्पन्न वाढणार, नोकऱ्यांच्या संधी वाढणार आणि गाव-शहरांमध्ये सुविधा वाढणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
60 वर्षे सत्तेवर राहणारा काँग्रेस 10 वर्षे सत्तेबाहेर राहिल्यावर आता आग लावण्याबद्दल बोलत आहे. काँग्रेसचे हे वर्तन योग्य आहे का? देशात आग लावणार असे म्हणणे योग्य आहे का? आणीबाणीची मानसिकता असलेल्या काँग्रेसचा लोकशाहीवर भरवसा राहिलेला नाही. काँग्रेस देशाला अराजकतेच्या दिशेने लोटू इच्छित असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
रुद्रपूर हे शहर नैनीताल-उधम सिंह नगर मतदारसंघाच्या अंतर्गत येते. केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट येथून निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भट्ट यांनी या मतदारसंघात राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना पराभूत केले होते. राज्यातील सर्व 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.