येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील; शरद पवारांचे धक्कादायक विधान
2024 च्या निवडणुकीनंतर भाजप विरोधकांच्या राजकारणाची संभाव्य दिशा सांगताना येत्या काळात देशातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील किंवा काँग्रेस पक्षामध्ये विलीन होतील असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकिय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
राज्यामध्ये काल लोकसभेसाठी मतदान पार पडलं. पण त्याअगोदर शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
यावेळी निवडणुकीनंतर भारतीय राजकारणाची दिशा काय असणार आहे यावर भाष्य केले. ते म्हणाले, येत्या काळात देशातील अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसशी जवळीक साधतील नाहीतर काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय त्यांना सर्वोत्तम वाटेल." असं भाकित केलं.
यावेळी पत्रकारांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच विलीन होत आहे काय अशी विचारणा केली असता ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारसरणीचे आहोत.” असे स्पष्टीकरण दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या मुद्द्यावर मी आता काहीही बोलू शकत नाही…सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही काँग्रेसच्या जवळच आहोत. पण येत्या काळात पक्षाची रणनीती किंवा धोरणांसंबंधिचा कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. कारण येत्या काळात नरेंद्र मोदींशी जुळवून घेणे किंवा पचवणे कोणत्याही पक्षाला कठीण ठरणार आहे." असेही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार का या चर्चांना ऊत आला आहे. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी असल्याच्या काऱणावरून काँग्रेस पक्षाचा त्याग करून आपला नविन पक्ष स्थापन केला. पण अलीकडच्या काळात भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर तसेच आपल्या पक्षाच्या फुटीनंतर त्यांची काँग्रेस पक्षाशी सलगी वाढली आहे.