ब्रिटनच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 वर्षांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करार होणार : पंतप्रधानांचा दोन दिवसीय दौरा
वृत्तसंस्था/ लंडन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी ब्रिटनच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मोदींचा हा पंतप्रधान म्हणून तिसरा ब्रिटन दौरा असणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या निमंत्रणानुसार पंतप्रधान मोदी हे दौरा करत आहेत. कीर स्टार्मर हे पंतप्रधान झाल्यावर मोदींचा हा पहिला ब्रिटन दौरा आहे. तर या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेऊ शकतात.
लंडनमध्ये पंतप्रधान मोदी आणि स्टार्मर यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. यात दोन्ही नेत्यांदरम्यान भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार, संरक्षण तंत्रज्ञान आणि हवामान यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुक्त व्यापार करारासंबंधी दोन्ही देशांदरम्यान 3 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत चर्चा झाली असून ती आता पूर्ण झाली आहे.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. कराराच्या मसुद्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजते. मोदींसोबत वाणिज्य तसेच उद्योगमंत्री पियूष गोयल देखील ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. मुक्त व्यापार कराराशी संबंधित चर्चेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांकडून स्वाक्षरी झाल्यावर त्याला भारतात केंद्रीय मंत्रिमंडळ तर ब्रिटनच्या संसदेकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. याकरता 6 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो.
5 वर्षांमध्ये व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य
मुक्त व्यापार कराराचा उद्देश 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करत 120 अब्ज डॉलर्सवर नेणे आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यावर भारतात निर्मित पादत्राणे, कपडे, दागिने, हिरे यासारख्या उत्पादनांवरील ब्रिटनचे आयातशुल्क समाप्त होणार आहे. तर ब्रिटनची व्हिस्की, कार यासारखी उत्पादने भारतात स्वस्त होतील. करारामुळे दोन्ही देशांमध्ये डिजिटल, इंजिनियरिंग, मार्केटिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
करारामुळे या गोष्टी स्वस्त होणार..
कार्स : ब्रिटनमध्ये निर्मित आलिशान कार्स म्हणजेच जग्वार लँड रोवर आता भारतात कमी किमतीत मिळू शकते.
स्कॉच व्हिस्की आणि वाइन : ब्रिटनमधून येणारे मद्य आणि वाहनांवरील शुल्क कमी होईल. यामुळे ही उत्पादने पूर्वीपेक्षा कमी किमतीत मिळतील.
फॅशन अन् कपडे : ब्रिटनमधून येणारे ब्रँडेड कपडे, फॅशन प्रॉडक्ट्स आणि होमवेयर देखील स्वस्त होऊ शकतात.
फर्निचर, इलेक्ट्रिकल सामग्री : ब्रिटनमधून येणारे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रीयल मशीनरी कमी किमतीत मिळणार.
दागिने अन् रत्नं : भारतातील रत्नं आणि दागिन्यांवरील ब्रिटनचे शुल्क कमी होणार, ब्रिटनमधील भारतीय ग्राहकांसाठी उत्पादने स्वस्त होणार