पंतप्रधान मोदी यांचा नवा विक्रम
सलग नेतेपदी राहण्यात टाकले इंदिरा गांधींना मागे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एक नवा विक्रम नोंदला गेला आहे. शुक्रवारी त्यांनी देशाच्या नेतेपदी सलग राहण्यात इंदिरा गांधी यांना मागे टाकले आहे. अशा प्रकारे ते सलग नेतेपदी राहिलेले देशाचे द्वितीय नेते झाले आहेत. शुक्रवारी त्यांच्या नेतेपदाला 4 हजार 78 दिवस पूर्ण झाले आहेत. दिवंगत नेत्या इंदिरा गांधी या 1966 ते 1977 या काळात सलग 4 हजार 77 दिवस देशाच्या नेतेपदी राहिल्या होत्या. आता पंतप्रधान नरेंद मोदी यांनी त्यांना मागे टाकले आहे. त्यांनी राजकीय प्रवासात हे आणखी एक अंतर पार केले आहे.
यासमवेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आलेल्या सरकारचे सलग नेतृत्व करण्याचा आणखी एक नवा विक्रम केला आहे. 2001 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सलग 24 वर्षे ते कोणत्या ना कोणत्या लोकनियुक्त सरकारचे प्रमुख राहिले आहेत. त्यांच्या सलग नेतेपदाला लवकरच 24 वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही भारतीय नेत्याने ही कामगिरी आजवर केलेली नाही. .
अनेक विक्रमांची नोंद
आपल्या जवळपास 24 वर्षांच्या नेतेपदाच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विक्रम केले आहेत. त्यांनी इंदिरा गांधी यांना मागे टाकल्याच्या निमित्ताने या विक्रमांचीही आठवण केली जात आहे. देशाच्या सर्वोच्चपदी किमान दोन पाच वर्षांचे कार्यकाळ पूर्ण करणारे ते प्रथम बिगर काँग्रेस नेते आहेत. काँग्रेस पक्षातही नेहरु-गांधी घराण्यात जन्मलेल्या व्यक्ती सोडून हा विक्रम कोणाला करता आलेला नाही. दोनवेळा पूर्ण बहुमताचे सरकार केंद्रात स्थापन करणारे ते एकमेव बिगर काँग्रेसी नेते आहेत. देशाच्या सर्वोच्च पदी सर्वाधिक काळ राहिलेले ते प्रथम बिगर हिंदी नेतेही आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला येऊन देशाचे सर्वोच्चपद भूषविलेले ते प्रथम नेते आहेत. आपल्या पक्षाला किंवा आघाडीला (किंवा आपल्या सरकारला) सलग तीनदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देणारे ते एकमेव बिगर काँग्रेसी नेते आहेत. तसेच सलग तीनदा सर्वोच्च नेतेपद सांभाळणारे ते जवाहरलाल नेहरु यांच्यानंतरचे द्वितीय नेते आहेत. इंदिरा गांधी यांनाही सलग तीनदा आपले सरकार निवडून आणणे जमले नव्हते. सलग सहा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला विजयी करणारे ते एकमेव भारतीय नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गुजरात विधानसभेच्या सलग तीन, तर लोकसभेच्या सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत. हा विक्रम जवाहरलाल नेहरु यांनीही केलेला नाही, असे दिसून येते.
बहुविक्रमी नेता...
ड सलग सहा सार्वत्रिक निवडणुका जिंकून सरकार स्थापणारे एकमेव नेते
ड सलग दोनदा लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवणारे एकमेव बिगरकाँग्रेसी नेते
ड सर्वाधिक काळ देशाच्या सर्वोच्च पदी राहिलेले एकमेव बिगर हिंदी नेते
ड देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला येऊन सर्वोच्च पद मिळविलेले प्रथम नेते
ड देशाच्या सर्वोच्च पदी सलग राहिलेल्यांमध्sय आता ते दुसऱ्या क्रमांकावर
ड सलग तीनदा स्वपक्षाला किंवा आघाडीला विजयी करणारे ते द्वितीय नेते