For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांची अनेक नेत्यांशी भेट

06:56 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांची अनेक नेत्यांशी भेट
Advertisement

द्विपक्षीय संबंधांवर चर्चा, अमेरिकन उद्योगपतींना केले भारतात अधिकाधिक गुंतवणुकीचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत अनेक देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. या नेत्यांमध्ये नेपाळचे नेते के. पी. शर्मा ओली, पॅलेस्टाईनचे नेते मोहम्मद अब्बास आणि कुवैतचे राजपुत्र शेख सबाह खालेद अल-हमद अल-सबाह अल-सबाह यांचा समावेश होता. त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक आणि व्यापार इत्यादी विषयांवर चर्चा केली.

Advertisement

त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील अनेक जगप्रसिद्ध उद्योगपतींशीही संवाद साधला आहे. उद्योगपतींच्या एक परिषदेलाही त्यांनी संबोधित केले. भारतात आता गुंतवणूक आणि विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारतात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि लाभदायक ठरणार आहे. म्हणून अमेरिकेतील उद्योगांनी मोठ्या प्रमाणात ही संधी घ्यावी आणि भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

उच्च तंत्रज्ञानासाठी भारत सज्ज

सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धीमत्ता, जैव तंत्रज्ञान आणि क्वांटम काँप्युटिंग आदी तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. अनेक कंपन्यांनी भारतात डिझाईन केंद्रे, संशोधन केंद्रे आणि उत्पादन केंद्रे स्थापन केली आहेत. विशेषत: सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत जगाचे उत्पादन केंद्र बनू इच्छित आहे. अमेरिकेच्या कंपन्यांनी या क्षेत्रांमध्ये भारतात गुंतवणूक करावी. भारतात उच्चशिक्षित मानवबळ मोठ्या प्रमाणात असून या मानवबळाला लाभ भारताला तसेच जगालाही होऊ शकतो. भारतातील अनुकूल परिस्थितीमुळे आज जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले असून तंत्रविज्ञान क्षेत्र भारतासंबंधी आशावादी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती

गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. प्रत्येक सप्ताहात एका नव्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. तर दोन नवी महाविद्यालये प्रत्येक दिवशी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक दिवशी एका नव्या आयटीआय प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 10 वर्षांपूर्वी होती, त्याच्या दुप्पट झाली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण वाजवी दरात मिळावे, यासाठी भारत सरकार पुढाकार घेत आहे. भविष्यकाळाचा वेध घेऊन शिक्षणक्रांनी घडविण्याचे कार्य जोमाने होत असून भविष्यातही ते होत राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारतातच संशोधन लाभदायक

आजवर भारताचे तंत्रज्ञ विदेशात जाऊन तेथे संशोधन करीत होते किंवा उत्पादन डिझाईनिंगच्या क्षेत्रात काम करीत होते. तेथे त्यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ख्याती प्राप्त केली आहे. आता भारतातच संशोधन केंद्रे स्थापन होत असून तंत्रज्ञानाचा विकास केला जात आहे. विदेशी कंपन्यांनाही आता भारतात संशोधन आणि डिझाईनिंग करण्यात स्वारस्य वाटू लागले आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांमध्ये अशा केंद्रांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींसमोर व्यक्त केला,

भारताची 5 जी बाजारपेठ

भारताची 5 जी बाजारपेठ आता अमेरिकेपेक्षाही मोठी झाली असून ती आणखी वाढणार आहे. गेल्या अवघ्या दोन वर्षांमध्येच ही प्रगती झाली आहे. आता भारत भारतीय बनावटीच्या 6 जी तंत्रज्ञानाची प्रतीक्षा करीत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारत सरकारने या क्षेत्राचा विकास करण्यासाठी योग्य ती धोरणे स्वीकारली. या धोरणांचा हा परिणाम आहे. आता भारत संधी शोधणारा देश नव्हे, तर संधी निर्माण करणारा देश बनला आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादनही त्यांनी केले.

सुंदर पिचाईंकडून कौतुक

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयशक्तीचे कौतुक केले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही भारतात अधिकाधिक संशोधन आणि डिझाईनिंग केंद्रे स्थापन करण्यास उद्युक्त होत आहोत. भारताच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विचार ते अग्रक्रमाने करतात आणि त्यानुसार निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात आजवर भारताची अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे, अशी भलावण सुंदर पिचाई यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अनेक महत्वपूर्ण उद्योगपतींशी व्यक्तीगत चर्चा करुन त्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

लॉस एंजल्समध्ये दूतावास स्थापणार

भारताचा एक व्यापारी दूतावास अमेरिकेतील सिएटल येथे कार्यरत करण्यात आला आहे. आता लॉस एंजल्स आणि बोस्टन येथे प्रत्येकी दोन व्यापारी दूतावास स्थापन केले जाणार आहेत. अमेरिकेशी व्यापारात सर्वंकष वाढ करण्याचा भारताचा प्रयत्न असून त्या दृष्टीने धोरण आखले जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

भरगच्च कार्यक्रम

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम

ड अमेरिकेतील अनेक ख्यातीप्राप्त उद्योगपतींशी पंतप्रधान मोदी यांचा संवाद

ड सेमीकंडक्टर आणि जैवतंत्रज्ञान निर्मितीवर भारताचा भविष्यात भर असणार

Advertisement
Tags :

.