युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींचा पुढाकार
इराणचे राष्ट्रपती पेझेश्कियान यांच्याशी चर्चा
वृत्तसंस्था/ तेहरान, नवी दिल्ली
गेल्या दहा दिवसांपासून इराण-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असतानाच आता त्यात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संघर्ष मिटविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ‘एक्स’वर यासंबंधीची माहिती दिली. ‘मी इराणच्या राष्ट्रपतींशी बोललो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि तणाव वाढल्याबद्दल सखोल चिंता व्यक्त केली. मी तणाव कमी करण्याचे, संवाद आणि राजनैतिकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तसेच दोन्ही देशांमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याच्या गरजेवर भर दिला,’ असे मोदी यांनी म्हटले आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यात 13 जूनपासून युद्ध सुरू झाल्यापासून प्रचंड विनाश झाला आहे. याचदरम्यान रविवारी पहाटे अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली. अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधताना वाढत्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. संघर्षमय परिस्थिती त्वरित शांत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय पंतप्रधानांनी केले आहे.
अमेरिकेच्या हल्ल्याचा अनेक देशांकडून निषेध
अनेक देशांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. चीन, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरातीसह जगातील अनेक देशांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषत: कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.