पंतप्रधान मोदी लाओस दौऱ्यावर जाणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाओसच्या दौऱ्याचा प्रारंभ 10 ऑक्टोबरपासून होणार आहे. तेथे ते 21 व्या एसिआन-भारत शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच ते 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत. लाओसचे नेते सोनेक्षय सिफानडोन यांच्या निमंत्रणावरुन ते व्हीएनटीआनलाही भेट देणार आहेत. ही माहिती परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली आहे.
या दौऱ्यात ते अनेक देशांच्या नेत्यांची द्विपक्षीय संबंधांच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या आतापर्यंतच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात ‘पूर्वेकडे पहा’ या धोरणाचा पुरस्कार केला होता. या धोरणाला यंदा 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांच्या या पूर्वेकडच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. एसिआन देशांशी घनिष्ट आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध हा त्यांच्या ‘पूर्वेकडे पहा’ या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. भारत या धोरणाद्वारे प्रशांत-भारतीय क्षेत्रातही मोठी भूमिका घेऊ पहात आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रगतीचा आढावा घेणार
21 व्या आसिआन-भारत शिखर परिषदेत आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. सर्वंकष धोरणात्मक भागीदार या तत्वाच्या माध्यमातून हा आढावा घेण्यात येईल. या परिषदेत सर्व सदस्य देशांच्या नेत्यांना एकमेकांशी निकटचा संपर्क करण्याची, तसेच सामुहिकरित्या विचारविमर्ष करण्याची संधी मिळणार आहे, अशीही माहिती परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली आहे.