For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी करणार ‘ध्यानधारणा’

06:27 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी करणार ‘ध्यानधारणा’
Advertisement

लोकसभा निवडणूक मतदानाच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याचा प्रकट प्रचार येत्या गुरुवारी, अर्थात 30 मे 2024 या दिवशी संध्याकाळी सहाला समाप्त होणार आहे. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे समुद्रात निर्माण करण्यात आलेल्या ‘स्वामी विवेकानंद स्मृती’स्थळी प्रार्थना आणि ध्यानधारणा करणार आहेत. सुविख्यात तामिळ संत थिरुवेल्लुवर यांच्या प्रतिमास्थळाचीही ते यात्रा करणार असून तेथेही ते काही काळ ध्यानधारणा करणार आहेत. एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाची माहिती दिली.

Advertisement

गुरुवारी प्रकट प्रचाराची सांगता झाल्यानंतर त्वरित त्यांचे कन्याकुमारी येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते या दोन्ही प्रसिद्ध तीर्थस्थळांची यात्रा करतील. संत थिरुवेल्लुवर यांच्या प्रतिमेचे दर्शन ते 30 मे या दिवशीच घेतील, अशी शक्यता आहे. नंतर ते स्वामी विवेकानंद स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. तेथे 1 जून पर्यंत ते वास्तव्यास असतील, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सलग तिसरी वेळ

Advertisement

? लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर ही ध्यानधारणा

? सागरात असलेल्या स्वामी विवेकानंद स्मृतिस्थळात 30 मे    या दिवशी येणार

? 2014 च्या निवडणूक प्रचारानंतर त्यांनी केली होती प्रतापगडाची यात्रा

? 2019 च्या निवडणूक प्रचारानंतर केदारनाथ या तीर्थस्थळी ध्यानधारणा

सुरक्षा व्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या यात्रा काळात स्वामी विवेकानंद स्मृती स्थळी मोठी सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. या सुरक्षेची सज्जता आत्तापासूनच केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षा सैनिक असतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

प्रचारानंतरची प्रथा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर तीर्थस्थळी किंवा ऐतिहासिक स्थळी ध्यानधारणा करण्याची प्रथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:साठी पाडली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित प्रतापगड या स्थळाची यात्रा केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर त्यांनी हिमालयातील केदारनाथ या तीर्थस्थळाची यात्रा केली होती आणि तेथे ध्यानधारणा केली होती.

कन्याकुमारीचे महत्व

कन्याकुमारी येथील सागरात एका खडकावर तपश्चर्या करत असताना स्वामी विवेकानंद यांना ‘भारत माते’चे दर्शन घडले होते. तेव्हापासून हे स्थळ प्रसिद्ध झाले आहे. ज्या खडकावर त्यांनी तपश्चर्या केली, तो खडक मुख्य भूमीपासून 500 मीटर अंतरावर समुद्रात आहे. आज या स्थळाला तीर्थस्थळाचे महत्व प्राप्त झाले असून प्रतिवर्षी लक्षावधी धार्मिक पर्यटक या स्थळाच्या दर्शनासाठी येत असतात. ज्या प्रमाणे भगवान गौतम बुद्धाच्या जीवनात ‘सारनाथ’चे महत्व आहे, तशाच प्रकारचे महत्व स्वामी विवेकानंदांच्या जीवनात या खडकस्थानाचे आहे, असे मानले जाते. स्वामी विवेकानंदांनी येथे तपश्चर्या करण्यापूर्वी संपूर्ण भारताचा प्रवास केला होता. नंतर येथे तपश्चर्या करताना त्यांना भारतमातेचा साक्षात्कार झाला होता. या ठिकाणी देशभरातून लोक येत असतात.

भारताचे दक्षिण टोक

कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. या स्थळी भारताचा पश्चिम सागरतट आणि पूर्व सागरतट एकमेकांना मिळतात. तसेच येथे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यांचा संगमबिंदूही आहे. त्यामुळे या स्थानाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व अधिकच मानले जाते. संगमस्थानाचा सागरतट नयनमनोहर आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची अक्षरश: रीघ लागलेली असते.

स्वामी विवेकानंद स्थळाचे निर्माणकार्य

स्वामी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेल्या पण नंतर दुर्लक्षित झालेल्या या सागरातील खडकाचे रुपांतर भव्य आणि प्रेक्षणीय अशा स्मृती स्थळात करण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनाथजी रानडे यांना आहे. त्यांनी 1960 च्या दशकात अत्यंत कष्टपूर्वक हे जटील कार्य सिद्धीस नेले आहे. त्यावेळी त्यांना तामिळनाडूच्या तत्कालीन ‘निरीश्वरवादी’ प्रशासनाचाही मोठा विरोध सहन करावा लागला होता. तरीही या विरोधावर विजय मिळवत त्यांनी मोठी जनशक्ती या प्रकल्पामागे उभी करण्यात यश मिळविले होते. अखेर प्रशासनानेही या कार्यात त्यांना साहाय्य करण्याचे मान्य केल्याने प्रकल्प मार्गी लागला. तो साकारण्यासाठी एकनाथजी रानडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रदीर्घ कालावधी लागला. पण त्यांनी हे अशक्य मानले गेलेले कार्य अत्यंत निष्ठेने, संयमाने आणि चिकाटीने पूर्ण केले. या स्थळी आधुनिकता आणि पुरातनता यांचे सुरेख मीलन साध्य करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या भव्य प्रतिमेच्या दर्शनासमवेत पर्यटकांना ध्यानधारणा, अनुष्ठान आणि प्रार्थना करण्यासाठी मोठ्या मंटपाचीही सुविधा आहे.

Advertisement
Tags :

.