पंतप्रधान मोदी आजपासून इंडोनेशिया दौऱयावर
जी-20 शिखर परिषदेत होणार सहभागी ः इंडोनेशियासोबतच्या संबंधांना मिळणार बळ
वृत्तसंस्था / बाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाली येथे आयोजित होणाऱया 17 व्या जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 14-16 नोव्हेंबरपर्यंत इंडोनेशियाच्या दौऱयावर असणार आहेत. यासंधी इंडोनेशियातील भारताचे राजदूत मनोज कुमार भारती यांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱयामुळे भारत-इंडोनेशिया यांच्यातील संबंधांना नवे बळ मिळणार आहे. इंडोनेशिया आणि विशेषकरून बाली येथे राहणाऱया भारतीय समुदायात मोदींच्या दौऱयावरून विशेष उत्साह आहे. पंतप्रधान मोदी तेथील भारतीय समुदायाला संबोधित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जी-20 मध्ये इंडोनेशियाच्या अध्यक्षत्वाला भारताने पूर्ण समर्थन दिले आहे. जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच सक्रीय सहकार्य करत आला आहे. इंडोनेशियानंतर जी-20चे अध्यक्षत्व भारताकडे येईल, भारत वसुधैव कुटुंबकमच्या भावनेसह पुढे जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजदूत भारती यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच बाली दौरा आहे. या ठिकाणचे भारताशी जुने आणि सांस्कृतिक नाते आहे. अलिकडेच इंडोनेशियात भारतासोबतचे संबंध दर्शविणारे पुरातात्विक अवशेष मिळाले असून ते ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे असे उद्गार राजदूतांनी काढले आहेत.
इंडोनेशिया हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा सहकारी आहे. एका देशात जगातील दुसऱया क्रमांकाची लोकसंख्या आहे, तर दुसऱया देशात चौथ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. दोन्ही देश जगातील मोठी लोकशाही असणारे असून वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाही धारण करून आहेत. अशा स्थितीत परस्परांमधील सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. इंडोनेशियाच्या कोळसा अन् पामतेलाचा भारत सर्वात मोठा खरेदीदार आहे. तर भारतासाठी औषध, सॉफ्टवेअर समवेत अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी संधी असल्याचे उद्गार भारती यांनी काढले आहेत.
दोन्ही देश संरक्षण क्षेत्रातही सहकार्य करत आहेत. विशेषकरून प्रशिक्षणासाठी दोन्ही देशांदरम्यान एक्सचेंज कार्यक्रम आहे. हिंद-प्रशांत व्यूहनीतिवरून दोन्ही देश परस्परांमध्ये अनेक मुद्दय़ांवर संवाद अन् ताळमेळ राखून आहेत. चीन हा इंडोनेशियातील सर्वात मोठा गुंतवणुकदार आहे, ही बाब खरी आहे, परंतु इंडोनेशिया भारताची गुंतवणूक वाढविण्यास इच्छुक ओह. इंडोनेशियात भारतीय गुंतवणूक सुमारे 54 अब्ज डॉलर्स ओत, परंतु यातील 95 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूरमार्गे दाखल होत आहे. थेट भारतातून येणाऱया गुंतवणुकीचा आकडा 2 अब्ज डॉलर्सपेक्षाही कमी आहे. खासगी गुंतवणुकदारांचा इंडोनेशियाकडील ओढा वाढावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.