पंतप्रधान मोदी आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर
जॉर्डन, इथियोपिया अन् ओमानला देणार भेट : द्विपक्षीय भागीदार होणार मजबूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा चार दिवसांचा असून यात ते जॉर्डन, इथियोपिया आणि ओमानला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचा उद्देश द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्यासोबत व्यापार, संरक्षण आणि क्षेत्रीय सुरक्षेला चालना देणे आहे.
पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्याची सुरुवात सोमवारी होईल. 15-16 डिसेशंबर रोजी पंतप्रधान मोदी हे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. 16-17 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी हे इथियोपियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर अंतिम टप्प्यात 17-18 डिसेंबर रोजी ते ओमानमध्ये असतील.
जॉर्डनचा दौरा महत्त्वपूर्ण
विदेश मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींच जॉर्डन दौरा दोन्ही देशांच्या संबंधांना मजबूत करणार आहे. यामुळे भारत-जॉर्डन दरम्यान आर्थिक सहकार्य वाढेल आणि क्षेत्रात शांतता प्रस्थापित होणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
पहिल्यांदाच इथियोपिया दौरा
16 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी हे जॉर्डनमधून इथियोपियासाठी रवाना होतील. पूर्व आफ्रिकन देश इथियोपियामध्ये त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. यादरम्यान मोदी हे अदीस अबाबामध्ये इथियोपियाचे पंतप्रधना अबी अहमद अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
ओमानशी दृढ संबंध
इथियोपियानंतर पंतप्रधान मोदी हे 17 डिसेंबर रोजी ओमानमध्ये पोहोचतील. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे ओमानचे राजे हॅथम बिन तारिक यांच्याशी चर्चा करणार आहेत. भारत आणि ओमान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदींचा हा दौरा होणार आहे. 2023 नंतर ओमानमध्ये त्यांचा हा दुसरा दौरा असणार आहे. ओमानकडून भारताला काही लढाऊ विमाने प्राप्त होणार असल्याची चर्चा आहे. या जुन्या लढाऊ विमानांच्या मदतीने भारतीय वायुदलाला काही प्रमाणात मदत होणार आहे.