For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसऱ्या टर्मसाठी सावध पंतप्रधान मोदी

06:07 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिसऱ्या टर्मसाठी सावध पंतप्रधान मोदी
Advertisement

तिसऱ्या टर्मसाठी  आसुसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत सावध पवित्रा घेतला आहे. अचानक बंडखोरीचा उद्रेक होऊ नये आणि आपल्याला निवांतपणे पंडीत नेहरुंप्रमाणे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनता यावे याकरीता मोदींनी खबरदारी घेतली आहे. हे भाजपने  शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवरुन दिसून येते. त्यामुळेच  उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये त्यांनी सिटींग गेटींगचे तत्व अंमलात  आणल्याचे दिसते. दुष्यंत सिंग (वसुंधरा राजेंचे पुत्र)  यांना पुन्हा तिकीट देऊन त्यांना शांत करायचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीकरता उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेला भाजपने सुरुवात करून भल्याभल्यांना घरी बसवण्याचा कार्यक्रमच जणू सुरु केला आहे असे बोलले जाते. पहिल्या 195 उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. पुढील निवडीत कोणाकोणाचे तिकीट कापले जाणार, कोणा मंत्री महाशयांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिला जाणार याविषयी उलटसुलट चर्चा आहे.

‘पुरे घर के बदल डालुंगा’ अशी एका बल्ब तयार करणाऱ्या कंपनीची पूर्वी प्रभावी जाहिरात होती त्याप्रमाणे सरसकट उमेदवार बदलून ‘नवीन भारताकरिता नव्या दमाचे उमेदवार’ असे जाहीर करून सर्व ओल्या-सुक्यांना नारळ दिला जाण्याची भीती पक्षात दिसत आहे. पक्षाचे चिन्ह ‘कमळ’ हेच आपले उमेदवार आहे हे ध्यानात ठेवा असे पंतप्रधान वरचेवर सांगत आहेत याचा अर्थ म्हणजे केवळ त्यांचे आणि फक्त त्यांचे नेतृत्वच संघटनेवर आहे आणि इतर सारे बदलले जाऊ शकतात असा होतो.

Advertisement

नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी’ चा मंत्रच जणू भाजपमध्ये म्हटला जात असल्याने कोण कोण म्हातारे अर्क हे मार्गदर्शक मंडळात पाठवले जाणार ते येत्या महिन्यात दिसणार आहे. नितीन गडकरी इत्यादी नेते फार मोठे आहेत असा समज झालेल्यांना झटकादेखील बसू शकतो. आज घडीला महाराष्ट्र भाजपमध्ये गडकरी यांना फारसे विचारले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पाटण्यातून शत्रुघ्न सिन्हा यांना हरवून विजयी झालेले माजी मंत्री रवि शंकर प्रसाददेखील बराच काळ अडगळीत पडलेले आहेत. सुशील मोदी यांना राज्यसभा नाकारून लोकसभा निवडणूक लढवायला सांगितले आहे असे वृत्त आहे. शनिवारी राजनाथ सिंग यांना लखनऊमधून तिकीट जाहीर झाले आहे. यापाठोपाठ नागपूरमधून अपेक्षेप्रमाणे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी भाजप जाहीर करु शकतो. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी राजनाथ यांना निष्प्रभ केले आहे तर केंद्रात त्यांच्याकडे मोठे खाते असले तरी फारसे अधिकारच नाहीत हे भाजपाईंना कळले आहे. याउलट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पंतप्रधानांच्या मर्जीतील नेत्यांना कर्नाटकमधून लोकसभेवर आणावयाचे घाटत आहे. भाजपच्या 300 हून अधिक लोकसभा सदस्यांपैकी 70 ते 80 जणांचे तिकीट कापण्यात येणार आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असे सांगितले जात आहे. दशकांपूर्वी दिल्लीत भाजपचा चेहरा असलेले माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना तिकीट मिळालेले नाही. काही नोकरशहांना देखील खासदार बनवण्याचा विचार सुरु आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून मोदींनी ज्या नवीन लोकांना संधी दिली त्याने पक्षातील जुने नेते हैराण झाले आहेत. मोदींना आपली टीम आणावयाची आहे आणि जुन्या धेंडांना घरी बसवायचे आहे याचा संदेश शिवराज सिंग चौहान, वसुंधरा राजे आणि रमण सिंग या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती खुळखुळा देऊन नुकताच दिला आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. शिवराजसिंग चौहान यांना विदीशा, मध्य प्रदेशमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. एकप्रकारे चौहान यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ‘मोदी को चुनना है’ ही सत्ताधारी पक्षाची घोषणा म्हणजे ‘हाथी के पाव मे सब के पाव आते हैं’ (हत्तीच्या पायात सगळ्यांचे पाय येतात/मावतात) आहे. नेत्याला निवडा मग तो सारी पिल्लावळ निवडेल. फक्त नेता महत्त्वाचा. बाकी सारे चिल्लर. इंदिरा गांधींच्या काळात ‘इंदिराजींचे हात मजबूत करा’ असा प्रचार व्हायचा त्याच धर्तीवर आज सुरु आहे. फक्त पक्ष वेगळा.

गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन यांचेच तिकीट अलगदपणे कापून भाजपमध्ये गहजब माजवला गेला होता.  महाजन यांना म्हणे एका जेष्ठ नेत्याने तुम्हाला निवडणूक लढायची आहे असे सांगितले आणि त्या तिकीटाची वाट पाहू लागल्या. सगळे उमेदवार जाहीर होत आहेत पण आपले नाव नसणार हे समजून आल्याने ताईंना आपली फसगत झाल्याचे समजून आले आणि आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर करून उरलीसुरली अब्रू वाचवली. जर लोकसभा अध्यक्षाचे असे हाल होऊ शकतात तर बाकीचे किस झाड की पत्ती. यावेळेला भरपूर नेत्यांचे हाल सुमित्राताईंप्रमाणे झाले तर नवल ठरणार नाही. कोणालाही आपले तिकीट गृहीत धरून चालता येत नाही.

श्रेष्ठी आयत्यावेळी काय विचार करणार आणि त्यात सदरहू नेता अथवा  नामदार/आमदार कितपत फिट बसतो त्यावर त्याला तिकीट द्यायचे की खड्यासारखे वगळायचे हे ठरत असते. हे ठरवणारे केवळ दोघेजणच. एक साक्षात मोदी आणि दुसरे त्यांचे उजवे हात असलेले अमित शहा. ते कोणाकडून माहिती काढतात अथवा त्यांचा कोणावर फार विश्वास आहे हे समजणे अवघडच. इतर पक्षातून आलेल्या नेत्यांचीदेखील अवघड अवस्था. अशोक चव्हाण यांच्यासारख्यांना एका झटक्यात मिळते. पण प्रत्येकाचे तसे नसते. मोदी-शहा कोणाला फारसे भेटत नसल्याने त्यांचे मन जाणून घेणे अवघड. ते 24 तास राजकारण करत असल्याने तसेच सरकारदेखील चालवत असल्याने त्यांचे माहितीचे स्रोत प्रचंड. पक्षाध्यक्ष जे पी न•ा हे त्या अर्थाने नेते नव्हेत. पंतप्रधानांची मर्जी असल्याने ते मोठे भासतात एव्हढेच.

थोडी नवलाई सरली की बहुतांशी भाजप खासदारांना दिल्लीचा कंटाळा येऊ लागतो कारण टाळ्या वाजवण्याव्यतिरिक्त आणि जयजयकार करण्यापलीकडे  त्यांना फारसे कामच राहत नाही. फारसे कोणी मंत्री महाशय त्यांना भेटत नाहीत. पक्षाच्या बैठका नियमितपणे होतात त्यांना हजर राहावे लागते. त्यातून संदेश घ्यावा लागतो आणि काम करावे लागते. निशिकांत दुबे यांच्यासारखे वादग्रस्त खासदार असूनही सरकार दरबारी एव्हढे वजनदार का? अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांना पडतात. आपणही आज उद्या मंत्री होऊ ही आशा बऱ्याच जणांना शांत ठेवते इतकेच. राजकारणात टिकायचे असेल तर आमदार/खासदार झालेच पाहिजे हे बाळकडू पिल्याने ‘पळा, पळा, पुढे कोण पळे तो’ अशा शर्यतीत लागतो. उत्तर प्रदेशमधील भाजपचे तिकीट वाटप भाजपकरता सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री योगी हे तिकीट वाटपात समर्थकांना तिकीट मिळण्यासाठी जोर लावणार आणि आपल्या विरोधकांना काटण्याचा आग्रह धरणार असे पक्षात बोलले जात आहे. सध्या सारी दाने ही मोदींच्या बाजूने पडत आहेत हे देखील तेव्हढेच खरे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.