पंतप्रधान मोदी बनले सक्रीय पक्ष सदस्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता भारतीय जनता पक्षाचे प्रथम ‘सक्रीय सदस्य’ बनले आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या हस्ते बुधवारी ‘सक्रीय सदस्य अभियाना’चा प्रारंभ करण्यात आला. त्यांनी स्वत:चे भारतीय जनता पक्षाचे ‘सक्रीय सदस्य’ होऊन या अभियानाचा शुभारंभ बुधवारी केला.
भारतीय जनता पक्षाची सदस्यसंख्या आणखी वाढावी, यासाठी भारतीय जनता पक्षाने हे नवे आणि कल्पक अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत या पक्षाचा सक्रीय सदस्य होणाऱ्याला किमान 50 सदस्य पक्षाला मिळवून द्यावे लागतात. हे नवे सदस्य एका मतदानकेंद्राच्या कार्यकक्षेतील किंवा एका विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकक्षेतील असावे लागतात. तसेच पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये केवळ सक्रीय सदस्यच भाग घेऊ शकतात. या निवडणुकांची प्रक्रियेलाही आता प्रारंभ करण्यात आला असून सर्व स्तरांवरील निवडणुका येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ‘सक्रीय सदस्य’ नोंदवून घेण्याचे अभियान भारतीय जनता पक्षाने हाती घेतले आहे. हे अभियान पंधरा दिवस चालणार आहे. दर सहा वर्षांनी भारतीय जनता पक्षाकडून पक्ष सदस्य नोंदणी करण्यासाठी अभियान आयोजित केले जाते. सदस्य संख्येच्या दृष्टीने आता भारतीय जनता पक्ष भारतातील सर्वात मोठा पक्ष असून काँग्रेस दुसरा आहे. भारतीय जनता पक्षाची सदस्यसंख्या सध्या एक कोटीच्या वर आहे, असे प्रतिपादन या पक्षाकडून केले जाते. सक्रीय सदस्य नोंदणीचे काम यावेळी अधिक जोरदारपणे केले जाणार असून त्यामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.