किंमत नसलेले ‘मेन्यूकार्ड’
आपल्या सर्वांना हॉटेलातील मेन्यूकार्ड परिचित आहे. या कार्डावर त्या हॉटेलात उपलब्ध असणारे खाद्य किंवा पेयपदार्थांची नावे असतात. तसेच प्रत्येक पदार्थाच्या नावापुढे त्याची किंमतही दिलेली असते. कोणत्याही पदार्थ मागविण्यापूर्वी बहुतेक सर्व ग्राहक त्याची किंमतही पाहतात. आवडणारा आणि किमतीच्या दृष्टीने परवडणारा पदार्थ ग्राहकाला निवडता यावा, यासाठी हे कार्ड असते. पण समजा, या मेन्यूकार्डावर पदार्थांची नावे तर आहेत, पण किंमत दिलेली नाही, तर आपण अशा हॉटेलात जाणे आपल्याला टाळावे लागेल. कारण केवळ पदार्थांची नावे पाहून आपण निवड केली आणि नंतर त्यांचे बिल अव्वाच्या सव्वा आले तर ते द्यायचे असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तसेच पदार्थ निवडल्यानंतर त्याची किंमत वेटरला तोंडी विचारणे आणि त्यानुसार निर्णय घेणेही शक्य नसते. त्यामुळे पदार्थांपुढे किंमत दिलेली असायलाच हवी, असा आपला आग्रह असणे स्वाभाविक आहे. तथापि सीरीया या देशात एक अजबच प्रथा आहे.
येथे कित्येक हॉटेलांमधील मेन्यूकार्डांवर पदार्थांची किंमतच दिलेली नसते. याचे कारण या देशातील प्रचंड महागाई हे आहे. या देशाच्या चलनाची किंमत जगाच्या बाजारात इतकी कमी झालेली आहे, की पोते भरुन नोटा नेल्या तर पिशवीभर सामान मिळावे अशी स्थिती आहे. अशा स्थितीत मेन्यूकार्डांवर पदार्थांच्या किमती दिल्या तर त्या पाहून विदेशी ग्राहक घाबरतील आणि हॉटेलांमध्ये येणारच नाहीत, अशी भीती इथल्या हॉटेल मालकांना वाटत असते. हॉटेलांमधील पदार्थांचे दर इतके अधिक असतात, की स्थानिक लोक हॉटेलांमध्ये जातच नाहीत. त्यामुळे हॉटेले केवळ विदेशी पर्यटकांवर चालतात. विदेशी पर्यटकांनाही हॉटेलात जाऊन आहार घेतल्यानंतर एका डिशसाठी अक्षरश: नोटांचा गठ्ठा द्यावा लागतो. तीन दशकांपूर्वी या देशाच्या पौंड या चलनाची किंमत 50 अमेरिकन डॉलर इतकी होती. आज ती 15 हजार सीरियन पौंड इतकी आहे. एक कप कॉफीसाठी 25 हजार सीरीयन पौंड द्यावे लागतात. यावरुन एका जेवणासाठी किती खर्च येत असेल याची कल्पनाची पेलेली बरी. सध्या हा सीरीया देश त्यातील गृहयुद्धासाठी आणि नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे चर्चेत आहे. राजकीय अस्थिरतेमुळेच हा देश महागाईच्या खोल गर्तेत पडलेला आहे, असे तज्ञ लोकांचे मत आहे.