For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव पालिका घोटाळाप्रकरणी पोलिसांवर दबाव

12:54 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मडगाव पालिका घोटाळाप्रकरणी पोलिसांवर दबाव
Advertisement

शॅडो कौन्सिलचा आरोप : आमदार विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही लक्ष घालावे : कुतिन्हो

Advertisement

मडगाव : मडगाव पालिकेत झालेल्या मोठ्या घोटाळ्याबाबत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मौनावर मडगावच्या शॅडो कौन्सिलने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही आणि पोलीस तक्रार दाखल करूनही चुकार पालिका कर्मचाऱ्याला अद्याप ताब्यात घेतलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यावरून काही राजकारणी पोलिसांवर या प्रकरणी सावकाश जाण्यासाठी दबाव आणत आहेत हे दिसून येते,असा आरोप कुतिन्हो यांनी केला आहे. त्याचप्रमाणे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सौ यांनीही हे प्रकरण हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्या मतदारसंघांतील घटक देखील या पालिकेच्या तिजोरीत योगदान देणारे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

मडगावच्या आमदारानी आपल्या माणसाला नगराध्यक्षपदावर बसवून पालिकेवर आपले नियंत्रण मिळावे यासाठी अध्यादेश काढण्याकरिता अवास्तव कारण पाहिले होते. मग ते या घोटाळ्याबाबत इतके गप्प कसे, असा प्रश्न कुतिन्हो यांनी केला. रॉबर्ट वाझ,दामोदर वंसकर आणि क्लिफर्ड डायस यांच्यासमवेत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना कुतिन्हो यांनी सांगितले की, मडगावच्या आमदारांनी चुकार कर्मचाऱ्याकडून संपूर्ण गैरव्यवहाराची रक्कम वसूल केली जाईल याची खात्री करणार हे जाहीर करावे.

Advertisement

शॅडो कौन्सिलने पुढे आरोप केला की, पालिकेमध्ये दोषारोपाचा खेळ सुरू झाला आहे, ज्याद्वारे नगराध्यक्ष मुख्यधिकाऱ्यांकडे बोटे दाखवत असल्याचे आढळते आणि मुख्यधिकारी फेस्ताच्या व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाचा भाग राहिलेल्या इतर पालिका अधिकाऱ्यांना दोष देत आहेत. विशेष म्हणजे 14 जून रोजी झालेल्या पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्षांनी असे सूचविले होते की, मुख्याधिकाऱ्यांनी घोटाळ्यास जबाबदार कारकून योगेश्वर शेटकर याला स्टॉल शुल्क वसूल करण्याचे अधिकार दिले आहेत. मग मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणापासून दूर कसे ठेवता येईल, असा सवाल कुतिन्हो यांनी केला.

योगेश्वर शेटकर याच्या सर्व बँक खात्यांतील ठेवी आणि काढलेल्या रकमेची चौकशी झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. कारण ते फेस्ताच्या फेरीच्या स्टॉल्समधून प्रत्यक्षात आलेल्या संकलनाचे सूचक असेल. प्रत्यक्षात वाटप केलेल्या स्टॉल्सची संख्या 315 पेक्षा जास्त होती, तथापि, सुऊवातीला केवळ 292 स्टॉल नोंदवले गेले होते, जे हळूहळू 296 आणि नंतर 299 पर्यंत वाढले, असे कुतिन्हो यांनी सांगितले. मुख्याधिकारी व लेखाधिकारी अभय राणे यांनी पालिकेच्या बैठकीत जाहीर केले होते की, शेटकर याने लेखी निवेदन सादर केले आहे.

घोटाळ्याशी संबंधित नसलेले कर्मचारी जोडून संपूर्ण प्रकरण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शॅडो कौन्सिलने केला. गैरवापर केलेल्या निधीच्या परताव्याची जबाबदारी केवळ कारकुनावर आहे. मात्र त्याने आपल्या पत्रात रकमेचा उल्लेख केलेला नाही, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. ज्येष्ठ नागरिक रॉबर्ट वाझ यांनी सांगितले की, पालिकेला आर्थिक वर्षासाठी व्यापार परवाना शुल्क आगाऊ भरावे लागते आणि जर कोणी पैसे भरण्यास उशीर केला, तर त्याला विलंब शुल्कासह मोठा दंड आकारला जातो. 18 लाखांहून अधिक निधी पालिका कर्मचाऱ्याने हिसकावून घेतल्याचे हे प्रकरण आहे, पालिका व्याजासह रक्कम वसूल करणार का, असा सवाल त्यांनी केला.

वसुली न झाल्यास मडगावकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करू

शॅडो कौन्सिलने इशारा दिला आहे की, मुख्य सचिव आणि पालिका प्रशासन संचालक यांच्याकडे अधिकृत तक्रारी दाखल करण्याव्यतिरिक्त ते पालिका निधीच्या वसुलीच्या मागणीसाठी सर्व करदात्यांना आणि अन्य मडगावकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करतील. जोपर्यंत गैरवापर केलेला निधी व्याजासह वसूल होत नाही तोपर्यंत सर्व करदात्यांनी पालिकेला कर भरणे बंद करावे, असे आवाहनही केले जाईल, असा इशारा कुतिन्हो यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.