For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धेश नाईक यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव

11:55 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धेश नाईक यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव
Advertisement

पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमध्ये आता बदलाचे वातावरण सुरू झाले असून जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांच्यावर राजीनाम्याचा दबाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीला आता नव्या अध्यक्षाचे वेध लागले आहेत. गेल्या वर्षी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षाच्या कारभारावर मंडळातील बहुतांश सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अध्यक्ष सिद्धेश नाईक यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम देखील यशस्वी झाली. मात्र प्रकरण वाढत चालल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नाराज सदस्यांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बोलवले आणि श्रीपाद नाईक यांना देखील या बैठकीस बोलविण्यात आले. बैठकीत जी चर्चा झाली त्यात श्रीपाद नाईक यांनी लोकसभा निवडणूक होईपर्यंत कृपया अध्यक्षाला हटवू नका, अशी विनंती केली होती, ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि त्यानंतर अध्यक्ष सिद्धेश नाईक हे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे मुख्यमंत्र्यांनी श्रीपाद नाईक यांचा हवाला देऊन त्याचवेळी उपस्थित जिल्हा पंचायत सदस्यांना आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणूक गोव्यात मंगळवारी झाली, मात्र बुधवार ओलांडल्यानंतर देखील सिद्धेश नाइक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नियमानुसार व दिलेल्या आश्वासनाची सिद्धेश नाइक यांनी अंमलबजावणी करायची आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा जिल्हा पंचायत सदस्यांनी व्यक्त केली. या सदस्यांनी आम्ही आणखी एक दिवसाची प्रतीक्षा करू नाहीतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार? याविषयी चौकशी करणार आहोत. असे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.