महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तीन उपमुख्यमंत्रिपदांसाठी हायकमांडवर दबाव

06:09 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी पाच मंत्र्यांची बैठक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्य काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा तीन उपमुख्यमंत्री नेमण्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात तीन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक करावी, यासाठी काही मंत्र्यांनी हायकमांडवर दबाव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या उद्देशाने गुरुवारी रात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी पाच मंत्र्यांची बैठक झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केली जातील का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, समाजकल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, अन्न-नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा, सहकारमंत्री के. एन. राजण्णा आणि आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव हे भोजनावळीनंतर सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी बैठकीत सहभागी झाले. हे सर्वजण मुख्यमंत्री सिद्धरामय्या गटातील नेते म्हणून ओळखले जातात. विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या प्रभावाला लगाम घालण्याची रणनीती आखण्यासाठी ही बैठक झाल्याचे सूत्रांकडून समजते. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदावर नजर ठेवल्याने सिद्धरामय्या यांनी आपल्या कट्टर समर्थकांमार्फत अधिक उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचे प्रयत्न चालविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गुरुवारी रात्री उशिरा पाच मंत्र्यांची बैठक झाली असून तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करून त्यापैकी दोन पदे दलित समुदायासाठी आणि आणखी एक पद प्रबळ वर्गासाठी देण्यासंबंधी वरिष्ठांवर दबाव आणण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे डी. के. शिवकुमार यांच्याकडे असणारे उपमुख्यमंत्रिपद राहणार की लिंगायत समुदायातील नेत्याला दिले जाईल, याविषयी अद्याप समजू शकलेले नाही.

अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट!

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याचे आपल्यासमोर उद्दिष्ट आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भोजनावळीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. यामागे विशेष राजकीय मुद्दा नव्हता. येत्या 10 जानेवारी रोजी राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला हे राज्य दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. लोकसभा निवडणुकीत राज्यातून काँग्रेसचे अधिक उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक विषयांवर पक्षाच्या बैठकीतच चर्चा होत आहे, असे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.

समुदायनिहाय उपमुख्यमंत्रिपदे देण्यासंबंधी हायकमांडच निर्णय घेणार आहे. सध्या पक्षसंघटना, लोकसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षित लागण्यासाठी पक्षातील नेत्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

भोजनावळीमागे कोणताही अजेंडा नव्हता!

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भोजनावळीसाठी बोलावले, ही बाब खरी आहे. आम्ही सर्वजण भोजनावळीत सहभागी झालो. परंतु, याला विशेष महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. ही मैत्रीपूर्ण भोजनावळ होती. यासाठी कोणताही अजेंडा नव्हता.

- दिनेश गुंडूराव, आरोग्यमंत्री

एससी, एसटी मेळाव्यातील निर्णय जारी करण्याविषयी चर्चा : डॉ. जी. परमेश्वर

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन भोजन करून आलो आहे. राजकीय विषयांवरही चर्चा झाली आहे. राजकारणी राजकीय विषयांवर बोलतात. मात्र, हा विषय उघडपणे सांगणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुसूचित जाती-जमातीच्या समुदायांचा मेळावा घेऊन 10 निर्णय घेतले होते. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे. त्यामुळे ते निर्णय जारी करण्याविषयी चर्चा केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Next Article