श्रीलंकेत आज राष्ट्रपती निवडणूक
चीन समर्थक अनुरा दिसानायके सर्वेक्षणात आघाडीवर
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेत शनिवारी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार नॅशनल पीपल्स पॉवरचे (एनपीपी) अध्यक्षपदाचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके या शर्यतीत आघाडीवर आहेत. अनुरा यांच्याव्यतिरिक्त आणखी तीन प्रबळ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वेक्षणात विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे हेही या शर्यतीत आहेत. त्यांच्या जिंकण्याची शक्मयता कमी असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले आहे.
श्रीलंकेत दोन वर्षांपूर्वी आलेले आर्थिक संकट अजूनही लोकांच्या मनात आहे. यामुळेच देशातील सर्वात मोठे ‘राजपक्षे’ घराणे गेल्या दोन दशकांपासून या शर्यतीतून बाहेर पडताना दिसत आहे. सद्यस्थितीत अनुरा कुमारा दिसानायके हेच निवडून येण्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. ते डाव्या पक्षांपैकी ‘जनता विमुक्ती पेरामुना’चे (जेव्हीपी) आहेत. एनपीपी आघाडीकडून ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. ते चीन समर्थक मानले जातात. आपला विजय झाल्यानंतर भारतीय उद्योगपती अदानींचा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, ‘जेव्हीपी’ पक्ष भारताच्या विरोधासाठी ओळखला जातो. 1980 च्या दशकात भारताने श्रीलंकेत एलटीटीईला सामोरे जाण्यासाठी शांतता रक्षक दल पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा जेव्हीपीने विरोध केला होता. अलिकडच्या वर्षांत ‘जेव्हीपी’ने आपली भारतविरोधी भूमिका बदलली आहे. मात्र, अनुरा यांनी निवडणुकीपूर्वी भारतीय कंपनी अदानीविरोधात वक्तव्य करून नवा वाद सुरू केला आहे. जेव्हीपी नेत्याने अलीकडेच 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यास श्रीलंकेतील अदानी समूहाचा पवन ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. अदानी प्रकल्प हा श्रीलंकेच्या ऊर्जा सार्वभौमत्वाला धोका असल्याचे अनुरा यांचे म्हणणे आहे. अदानी समूहाने पवन ऊर्जा केंद्र विकसित करण्यासाठी यावषी श्रीलंका सरकारसोबत करार केला आहे. यासाठी कंपनी 442 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 367 कोटी) गुंतवणूक करणार आहे.