रुद्रण्णा आत्महत्याप्रकरणी राष्ट्रपतींना निनावी पत्राद्वारे माहिती
कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दिशाभुलीचा आरोप
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, या मागणीसाठी राष्ट्रपतींना पत्र पाठविले आहे. या पत्राच्या प्रती उपलब्ध झाल्या असून तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचारी या प्रकरणाच्या तपासात दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे. रुद्रण्णा यडवण्णावर (वय 34) या अधिकाऱ्याने मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसीलदारांच्या कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यासंबंधी तहसीलदारांसह तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. तहसीलदारांसह तिघा जणांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांची चौकशीही सुरू आहे. तहसीलदार कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी तहसीलदारांच्याविरुद्ध कोणीही जबानी देऊ नये, असा दबाव घालताना दिसत आहेत.
याकडे निनावी पत्रात राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले आहे. पत्रात काही कर्मचाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्या दिवशी आत्महत्येची घटना घडली, त्याच दिवशी रुद्रण्णाच्या पत्नीवर अधिकाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल करू नये, यासाठी दबाव टाकण्यात आला होता. पत्नीसह कुटुंबीयांची दिशाभूलही केली आहे. तहसीलदार कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तहसीलदारांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, त्या दिवशी कार्यालयात गोड वाटण्यात आले आहे, असेही त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. अष्टे येथील एका जमीन मालकाच्या आत्महत्या प्रकरणाचाही पत्रात उल्लेख करण्यात आला असून या प्रकरणालाही तहसीलदार कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी कारणीभूत आहेत. या प्रकरणाचाही व्यवस्थित तपास झाला नाही. रुद्रण्णा आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी करण्यात आली असून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह स्थानिक अधिकाऱ्यांनाही हे पत्र पाठविले आहे.