राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकनच्या दौऱ्यावर
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सामील होणार : भारतात शनिवारी राजकीय शोक
वृत्तसंस्था/ व्हॅटिकन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पोप फ्रान्सिस यांच्या राजकीय अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी दोन दिवसांच्या व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर गेल्या अहेत. 21 एप्रिल रोजी वयाच्या 88 व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले होते. पोप यांच्या अंत्यसंस्कारात राष्ट्रपती मुर्मू या भारताचे प्रतिनिधित्व करतील आणि सरकार तसेच भारताच्या लोकांच्या वतीने संवेदना व्यक्त करणार आहेत.
राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पीटर्स बेसिलिकामध्ये दिवंगत पोप यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. 26 एप्रिल रोजी व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स स्क्वेयरमध्ये होणाऱ्या विधीत अनेक जागतिक नेते सामील होणार आहेत. कमीतकमी 130 विदेशी प्रतिनिधिमंडळांनी पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सामील होण्याची पुष्टी दिली असून यात 50 राष्ट्राध्यक्ष आणि 10 राजे सामील असल्याचे व्हॅटिकनडून सांगण्यात आले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे राजपुत्र विलियम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, स्पेनचे राजे फिलिप सहावे आणि राणी लेटिजिया तसेच ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लूला दा सिल्वा हे व्हॅटिकनमध्ये पोहोचणार आहेत.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला होता आणि भारताच्या लोकांबद्दलचे पोप फ्रान्सिस यांचे प्रेम नेहमीच स्मरणात ठेवले जाईल असे उद्गार काढले होते. भारतात 26 एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या सन्मानार्थ राजकीय शोक पाळला जाणार आहे.