'बिद्री'चे अध्यक्ष के. पी. पाटील देशपातळीवरील पुरस्काराने सन्मानित
सर्वाधिक एफआरपी व साखर कारखानदारीतील योगदानाची दखल; कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांची माहिती
सरवडे प्रतिनिधी
राष्ट्रीय पातळीवरील साखर आणि संबंधित उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय स्थरावर कार्यरत असलेल्या चिनीमंडी, नवी दिल्ली या संस्थेकडून दिला जाणारा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा सीइआयए पुरस्कार बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी पाटील यांना जाहीर झाला आहे. कारखाना व्यवस्थापन, संचालक मंडळ आणि तमाम सभासदांसाठी हे नक्कीच अभिमानास्पद आहे अशी माहिती कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली.
साखर उद्योगाशी सबंधीत नाविन्य, रुपांतरण, शाश्वत जागतिक यश आणि साखर उद्योगात उत्कृष्टता यासाठी चिनीमंडी या संस्थेने २०२४ च्या शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अवॉर्ड्स या पुरस्कारासाठी अध्यक्ष के. पी. पाटील यांची निवड केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला सर्वाधिक उसदर आणि साखर कारखानदारीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत याबाबत संस्थेचे संस्थापक व सीईओ यु. पी. शहा यांनी अध्यक्ष पाटील यांना निवडीचे पत्र पाठविले आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील ग्रॅंड हयात या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
बिद्री साखर कारखान्यात तब्बल ४० वर्षे संचालक आणि त्यापैकी १९ वर्षे अध्यक्षपदी असलेल्या के. पी. पाटील यांनी कारखान्यासाठी भरीव योगदान दिले आहे. उस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी उच्चांकी उसदर, गाळप विस्तारीकरण आणि सहवीज प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले आहेत. इथेनॉल प्रकल्पही अंतिम टप्प्यात असून लवकरच यातून प्रत्यक्ष उत्पादन सुरु होणार आहे. साखर कारखानदारीत त्यांचे कार्य आदर्शवत ठरल्याचे कार्यकारी संचालक चौगले यांनी सांगितले.