For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रेयाला हजर करा, माफी मागायला लावा

12:15 PM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रेयाला हजर करा  माफी मागायला लावा
Advertisement

श्रेयाला डिचोलीत न आणल्याने तणाव : डिचोलीत धोंडगणांचे ठिय्या आंदोलन,लईराईचा अपमान सहन न करण्यावर ठाम

Advertisement

डिचोली : देवी लईराईच्या धोंडगणांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी धोंडगणांच्या तक्रारीवरून अटक केलेल्या श्रेया धारगळकर यांना डिचोली पोलीस स्थानकावर हजर करा आणि माफी मागायला लावा, अशी मागणी लावून धरुन धोंडगणांनी काल बुधवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत डिचोली पोलीस स्थानकावर ठाण मांडले. श्रेयाला डिचोलीत आणत नसल्याने आक्रमक बनलेल्या धोंडगणांनी पोलीस स्थानकासमोरच रस्ता अडविला. त्यामुळे डिचोलीत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.डिचोली पोलीस उपअधीक्षक सागर एकोसकर, निरीक्षक राहुल नाईक यांनी धोंडगणांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु धोंडगणांनी कोणाचेही न ऐकता आपले आंदोलन रात्री उशिरापर्यंत चालूच ठेवले.

लईराई, धोंडगणांना अपशब्द

Advertisement

श्रेया धारगळकर यांनी देवी लईराईच्या धोंडगणांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी डिचोली पोलीस स्थानकात धोंडगणांनी गर्दी केली होती. पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर तिला त्वरित अटक करावी, तिच्याकडून समस्त धोंडगणांची व देवीची माफी मागून घ्यावी तसेच तिला गोव्यातून तडीपार करावे, अशी मागणी धोंडगणांनी केली होती. त्यावेळी श्रेया धारगळकर यांना कायद्याप्रमाणे अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिले होते.

श्रेयाला अटक, पण रवानगी अन्यत्र

देवी फातर्पेकरीणीचा अपमान केल्याबद्दल कुंकळ्ळी पोलीस स्थानकात अटकेत असलेल्या श्रेया धारगळकर यांना लईराई देवीचा अपमान केल्याबद्दल अटक करण्यासाठी न्यायालयात मंगळवारी 21 मे रोजी प्रक्रिया केली होती. न्यायालयातून पोलिसांना श्रेयाच्या अटकेची मंजूरी मिळाल्यानंतर डिचोली पोलिसांनी श्रेया हिला ताब्यात घेतले. तिच्या अटकेची सर्व प्रक्रिया डिचोली पोलीस स्थानकात केली. परंतु तिला डिचोली पोलीस स्थानकात न आणता इतरत्र नेल्याने डिचोली पोलीस स्थानकात धोंडगणांनी गोंधळ घातला.

श्रेयाला डिचोलीत न आणल्याने आंदोलन

काल बुधवारी श्रेया धारगळकर यांना डिचोली पोलिसांतर्फे अटक करण्यात येणार असल्याची कुणकुण सर्वांनाच लागली होती. त्यामुळे संध्याकाळी डिचोली पोलीस स्थानकावर शिरगाव, मये, डिचोली, साखळी व परिसरातील धेंडगणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. श्रेया धारगळकर हिला डिचोली पोलीस स्थानकावर आणल्यानंतर तिला धोंडगणांची व देवीची माफी मागायला लावणार, या अपेक्षेत असलेल्या धोंडगणांची यावेळी निराशा झाली. त्यामुळे त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

उशिरापर्यंत तणावग्रस्त वातावरण  

श्रेया धारगळकर हिला डिचोली पोलिसांनी अटक करून तिला कुंकळ्ळी येथून डिचोलीत न आणता इतरत्र नेल्याने डिचोली पोलीस स्थानकावर जमलेल्या धोंडगणांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रोष प्रकट केला. श्रेयाला डिचोलीत आणाच, त्याशिवाय आम्ही पोलीस स्थानक सोडणार नाही, असा पवित्रा धोंडगणांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत डिचोली पोलीस स्थानकावर मोठ्या संख्येने धोंडगणांनी जमाव केला होता.

डिचोली ते सांखळी वाहतूक ठप्प

डिचोली पोलीस स्थानकावर जमलेल्या भाविक व धोंडगणांनी रात्री पोलीस स्थानकासमोरील रस्ता अडविला. रस्त्यावर ठाण मांडल्याने डिचोली ते सांखळी हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला. या जमावासमोर डिचोली पोलीस उपअधीक्षक सागर एकोसकर, निरीक्षक राहुल नाईक यांनी धोंडगणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. श्रेया धारगळकरला लोकांसमोर आणणे जोखमीचे असल्याने सदर जोखीम आम्ही पत्करू शकत नाही, अशी भूमिका उपअधीक्षक सागर एकोसकर यांनी मांडली. त्यावर लोकांनी असमाधान व्यक्त करत तिला डिचोलीत आणाच असा आग्रह धरला. धोंडगणांनी आपले आंदोलन चालूच ठेवले. पोलीस स्थानकासमोरील अडविलेला रस्ता मोकळा केल्यानंतर धोंडगणांनी वाठादेव येथे नवीन बायपास रस्त्याच्या जंक्शनवर रस्ता अडवून वाहतूक ठप्प केली.

Advertisement
Tags :

.