उचगाव, काकती परिसरात गडगडाटासह वळिवाची हजेरी
अनेक झाडे-घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना : शेतकऱ्यांना दिलासा, पिकांना जीवदान : ऐन उकाड्यात पावसामुळे नागरिकही सुखावले
वार्ताहर /उचगाव
उचगाव परिसरात आणि बेकिनकेरे, गोजगे या संपूर्ण भागात शुक्रवारी सव्वा चारच्या सुमाराला प्रचंड वादळी वाऱ्यासह चमकणाऱ्या विजा आणि गडगडाटांसह जोरदार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जोरदार पावसामुळे वाढलेली उष्णता कमी करण्यास आणि शेतवडीतील पिकांना जीवदान देण्यास हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला आहे. जवळपास अर्धा तास पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले. गावातील मंडप भुईसपाट झाले. तर अनेक जुन्या इमारतीवरील कौलारू घरांची कौलेव पत्रेही उडाल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमाराला अतिशय वेगाने वादळी वारे आणि सोबत पावसाचा प्रचंड मारा आणि कडकडाटामुळे भागात भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक दिवसांपासून शेतकरी, नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच अगदी ऐन मागणीच्याच काळात पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी थोडासा सुखावला आहे.
अनेक पिकांना जीवदान
शेतवडीत असलेली ऊस, भाजीपाला, मिरची, मका अशी अनेक विविध पिके करपून जात असतानाच पावसाच्या कृपेने या पिकांना आता जीवदान मिळाले आहे. याबरोबरच अनेक विहिरींनी तळ गाठला होता. या पावसाचा थोडा का होईना परिणाम या विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठीही मदत होईल, असे काहींचे म्हणणे आहे. एकंदरीत शुक्रवारी झालेला वळीव पाऊस हा समाधानकारक झाल्याचे सर्वातून बोलले जात होते. उचगाव, गोजगे, तुरमुरी, बाची, बेकिनकेरे, अतिवाड, कोनेवाडी, कल्लेहोळ, सुळगा या संपूर्ण भागात या पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
काकती, गौडवाड, होनगा परिसरात वळिवाच्या पावसाची दमदार हजेरी
काकती : काकती, गौडवाड, होनगा परिसरात वळिवाच्या पावसाने विजांच्या कडकडाट आणि ढगाच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली आहे. शिवारातील ऊस, भाजीपाला पिकांना पोषक झाला आहे तर कडधान्य, तृणधान्य काढून खळ्यात ठेवलेल्या पिकांना मारक ठरला आहे. शुक्रवारी सायंकाळी 3.30 नंतर मेघगर्जनेसह पावसाने दमदार सुरुवात केली. ते दुपारी 4 वाजेपर्यंत विजेच्या लखलखाटासह पावसाच्या सरींनी जनजीवन विस्कळीत झाले. हवामानातील वाढलेली उष्णता कमी झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. परिणामी उष्णतेने सुकत चललेल्या ऊस, भाजीपाला पिकांना या पावसाने नवसंजीवनीच मिळाली आहे. गेल्या आठवड्यापासून उष्माघाताने साऱ्यांची घालमेल झाली होती. तर दुपारी 12 वाजल्यापासून ढगाळ वातावरणात उष्णतेने कहर केला होता. आज पाऊस पडतो असे वाटत होते. अखेर सायंकाळी पावसाने जोरदार दणका दिला. मेहनतीने कष्ट उपसून पिकवलेले कडधान्य, हरभरा, वाटाणा, मोहरी, जोंधळ्याची कणसे अशी रब्बी पिके मळणी करण्यासाठी खळ्यात ठेवण्यात आली होती. मात्र या पावसामुळे गोंड काळी धरणार आहे. शिवारात सिंचनाअभावी ऊस व भाजीपाला पीक मावळत असल्याने पिकांना नवजीवन मिळाले आहे. तर आंबा, काजू पिकांवर विपरित परिणाम झाला असून फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे.
सांबरा, मारिहाळ, कलखांब परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस
सांबरा : तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने लाहीलाही झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. शुक्रवारी दुपारी अचानक पूर्व भागामध्ये ढग दाटून आले व चारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस बसवन कुडची, निलजी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, होनीहाळ, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी, कलखांब, मुचंडी आदी भागांमध्ये झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले होते. अशातच शुक्रवारी झालेल्या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.