महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीमोल्लंघनाची सज्जता...

06:38 AM Oct 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय संस्कृतीत सणांना, उत्सवांना महत्त्वाचे स्थान असून, प्रत्येक सणामागे परंपरा वा शास्त्र आहे. यातील दसरा अर्थात विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण मानला जातो. खरंतर विजयादशमी म्हणजे विजयाचा दिवस. रामायण, महाभारत व अन्य पुराणकथांशी दसरोत्सवला जोडले जाते. प्रभू रामचंद्रांनी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करीत विजयप्राप्ती केली, असा रामायणकालीन संदर्भ आहे. महाभारतातील संदर्भानुसार पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीतून बाहेर काढली आणि ते युद्धसज्ज झाले. तेव्हापासून विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा अस्तित्वात आल्याची वदंता आहे. तर देवी दुर्गेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर दहाव्या दिवशी महिषासूराचा वध केला. हा दिवस म्हणजेच विजयादशमी, अशीही कथा सांगण्यात येते. खरंतर दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे विशिष्ट चौकट मोडून सीमा ओलांडणे, मुक्त होणे. सध्याची एकूणच राज्यांची, देशांची स्थिती पाहता हे सीमोल्लंघन ही काळाची गरज ठरते. वास्तविक, ‘नवरात्र’ म्हणजे स्त्राr शक्तीचा जागर. मात्र, आज हीच स्त्री सुरक्षित दिसत नाही. काळ बदलला, मुली शिकल्या, उच्चविद्याभूषित झाल्या. अनेक मोठ्या हुद्द्यावर महिला कार्यक्षमपणे काम करताना दिसतात. परंतु, आजही महिलांकडे पाहण्याचा पुऊषी दृष्टीकोन बदललेला दिसत नाही. उलट स्त्रीकडे केवळ भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. दिल्लीतील निर्भया प्रकरण असो, बदलापूर व पुण्यातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार असो अथवा बोपदेव घाटातील सामूहिक बलात्काराचे प्रकरण असो. त्यातून हेच अधोरेखित होते. हे पाहता भविष्यात स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील. आज स्त्रियांवरील अत्याचाराचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहे. आपल्याला आज ना उद्या न्याय मिळेल, हीच त्यांची भाबडी आशा आहे. मात्र, पीडित महिलांना तातडीने न्याय मिळण्यासाठी जलदगती न्यायालये मोठ्या संख्येने सुरू होणे महत्त्वाचे होय. मुळात भविष्यात अशा घटनाच घडू नयेत, याकरिता सर्व सुरक्षा यंत्रणांनी दक्ष रहायला हवे. सुजाण नागरिकांचेही या कामी सहकार्य लाभले, तर नक्कीच अशा गुन्ह्यांना आळा बसू शकतो. अर्थकारणाला गती मिळणे, एवढाच कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा मापदंड असू शकत नाही. म्हणूनच महाराष्ट्र, कर्नाटक असो अन्य कुठलीही राज्ये असोत. या राज्यांमध्ये महिला सुरक्षित असतील, तरच त्या राज्याचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल. दसरा मेळावा, हाही महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातला महत्त्वाचा भाग मानला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणाकडे तर संबंध देशाचे लक्ष असायचे. बाळासाहेबांनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे आता या मेळाव्यात मार्गदर्शन करतात. तर शिंदेसेनेनेही आपला स्वतंत्र दसरा मेळावा सुरू केला असून, यंदाही बीकेसी मैदानावर शक्तिप्रदर्शन करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्ज असतील. आगामी विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. हे बघता उद्धव ठाकरे काय बोलणार, याला महत्त्व असेल. शिंदेंच्या भूमिकेबाबतही उत्सुकता असेल. नागपूरमध्ये रा. स्व. संघाचे संचलन व त्यानंतर सरसंघचालकांचे मार्गदर्शन, हादेखील पायंडा जुना आहे. यंदा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोणती भूमिका मांडणार, याकडे महाराष्ट्राबरोबर देशाचे लक्ष राहील. तिकडे भगवानगडावरही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. यंदाही पंकजाताईंचे अनुयायी मोठ्या संख्येने यात सहभागी होतील, असे दिसते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचाही नारायणगडावर मेळावा होणार आहे. लोकसभेमध्ये जरांगे पाटील यांनी आपला प्रभाव दाखवून दिला. आता विधानसभेत मराठा कार्ड चालविण्यासाठी जरांगे पाटील सरसावले आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये सर्वांना पाडणार, ही लाईन घेऊनच जरांगे पाटील शहरे, गावे पालथी घालत आहेत. मराठवाडा जरांगेंचा सर्वाधिक प्रभाव आहे. इतरत्रही आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील दिसतात. स्वाभाविकच दसरा मेळाव्यात जरांगे काय बोलतात, हाही औत्सुक्याचा विषय म्हटला पाहिजे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यंदाही या भूमीवर नीलसागर उसळण्याची चिन्हे आहेत. एकूणच आज दसऱ्याच्या दिवशी संबंध महाराष्ट्र गजबजलेला असेल. दसरा आणि दिवाळी हे दोन सण परस्परांना जोडून येतात. कितीही मर्यादा आल्या, तरी हे दोन्ही सण आनंदात साजरा करण्याकडे लोकांचा कल असतो. तथापि, यंदा सणासुदीच्या तोंडावरच खाद्य तेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते. प्रति लिटर 100 ऊपयांपर्यंत सीमित असलेला खाद्यतेलाचा भाव आता 140 ऊपयांपर्यंत पोहोचला आहे. दिवाळीपूर्वी त्यात आणखी वाढ होऊ शकते. हे बघता यंदाच्या दिवाळीत नागरिकांना बरीच आर्थिक कसरत करावी लागेल, असे दिसते. म्हणूनच सरकारने योग्य ती पावले उचलून जीवनावश्यक वस्तूंचे दर फार भडकणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण व आरोग्य हीदेखील आज माणसाची महत्त्वाची गरज बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आजार व त्यावरील खर्चही वाढला आहे. शिक्षणही अतिशय महाग झाले आहे. हे बघता या दोन गोष्टींवर काँक्रिट काम कसे करता येईल, याचा संकल्प सरकारने यादिवशी करायला हवा. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झाली आहे. याशिवाय स्त्रियांना एसटी प्रवासात अर्धा आकार, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, या योजनाही लोकांना खुश करणाऱ्या आहेत. किंबहुना, बेरोजगारीचा प्रश्न आजही सुटलेला नाही. म्हणूनच आगामी काळात रोजगारनिर्मितीकडेही लक्ष द्यावे लागेल. सण उत्सव थकल्याभागल्या मनाला विसावा देतात, आनंद देतात. परंतु, कर्कश गाणी, धांडगधिंगा यामुळे या सगळ्यावर पाणी फेरले जाते. हे लक्षात घेता कुठलाही सण संयमाने साजरा करण्यावरही प्रत्येकाने भर द्यायला हवा.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article