पोटनिवडणुकीसाठी चांगली तयारी करा
योगी आदित्यनाथ यांचा भाजप कार्यकर्त्यांना संदेश
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या 10 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप कार्यकर्त्यांना चांगली तयारी करण्याचा संदेश दिला आहे. पोटनिवडणूक काहीशी अवघड असते असेही योगींनी गाजियाबादमध्ये पक्षाचे काही नेते आणि लोकप्रतिनिधींना संबोधित करताना म्हटले आहे. पोटनिवडणुकीसाठी सत्तारुढ भाजपसोबत विरोधीपक्ष सपने देखील पूर्ण शक्तिनिशी प्रचार चालविला आहे.
पोटनिवडणुकीसाठी चांगली तयारी करावी लागेल. पोटनिवडणुकीवेळी लोकांच्या मनात उत्साह नसतो. यामुळे मतदानाची टक्केवारी कमी राहते. याचमुळे घरोघरी संपर्क साधत मतदानाची टक्केवारी वाढवावी लागणार आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करावे लागेल. अनुसूचित जमातीशी अधिक संपर्क साधावा लागणार आहे. बूथस्तरावर जात हा संपर्क करावा लागणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
ही भारताची वेळ आहे, एका दशकात भारताने जगासमोर स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे. जागतिक व्यासपीठाववर भारत स्वत:च्या अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेत आहे. एकाच रणनीतिद्वारे युद्ध जिंकता येऊ शकत नाही, वेळोवेळी रणनीति आणि रणभूमी बदलावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात देश वेगाने वाटचाल करत आहे. पुढील तीन वर्षांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असे उद्गार योगी आदित्यनाथ यांनी काढले आहेत.