अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वतोपरीने तयारी करा
पालकमंत्री जारकीहोळी, विविध उपसमित्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
विधिमंडळाच्या हिवाळीच्या अधिवेशनाला 9 डिसेंबरपासून सुरूवात होत असून अधिवेशन सुनियोजितपणे होण्यासाठी विविध उपसमित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वतोपरीने तयारी करण्यात यावी, अशी सूचना पालकमंत्रीr तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.
अधिवेशन पूर्वतयारीच्या निमित्ताने विविध उपसमित्यांच्या अध्यक्ष व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात शनिवार दि.23 रोजी बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री बोलत होते.
अधिवेशनासाठी येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपाहार, भोजन, वाहतूक यासारख्या व्यवस्था उत्तमरितीने उपलब्ध करून द्याव्यात. तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांचे पथक व ऊग्णवाहिकेची सोय करावी. सुवर्णसौधच्या आतील क्वॉरिडॉरमध्ये व भोजनगृहात पावतीवर चहा, अल्पोपहार मिळण्याची व्यवस्था करावी. अधिवेशन काळात शेतकरी, विणकर, सरकारी कर्मचारी, बांधकाम कामगार यासारखे विविध मागण्या घेऊन सुवर्णसौधवर मोर्चा नेत असतात. सुवर्णसौधपासून काही अंतरापर्यंतच मोर्चे, आंदोलने नेण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. शहर आणि उपनगरातील नादुरुस्त रस्त्यांची कामे, त्वरित हाती घेऊन पूर्ण करावीत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी बांधकाम खाते व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.
अधिवेशन सुरळीतपणे होण्यासाठी विविध दहा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मागील वर्षातील अधिवेशनाप्रमाणे विविध स्थळांवर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. हायस्पीड इंटरनेट संपर्क व्यवस्था, कॉम्प्युटर, लेखन साहित्याची व्यवस्था सभागृहात करण्यात येणार आहे. याशिवाय अधिवेशनात सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी व अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्यांना पासची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुवर्णसौधच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुवर्णसौधपर्यंत घेऊन जाण्यासाठी बसची व्यवस्था यावर्षीही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या निमित्ताने सहा हजार पोलिसांची कुमक नियोजित करण्यात येणार असून प्रति वर्षाप्रमाणे यंदाही चोख बंदोबस्त असेल. सुवर्णसौधच्या परिसरात तंबू उभारून तेथे आंदोलन, मोर्चेकऱ्यांची व्यवस्थ करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.
वाहतूक सुरळीत होण्याकडेही लक्ष देण्यात येईल. अधिवेशन काळात बंदोबस्तासाठी येणारे पोलीस व केएसआरपी कर्मचाऱ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था चोखपणे करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त शुभा बी., जि. पं. मुख्य योजना संचालक गंगाधर दिवटर, ‘काडा’चे प्रशासक सतीशकुमार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता सोभरद, जिल्हा नगरविकास कोशचे योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी, आहार खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यासह विविध खात्याचे अधिकारी पूर्वतयारी बैठकीला उपस्थित होते.