शिवाजी पुल- गांधीनगर उड्डाणपूल डिपीआर तयार करा
कोल्हापूर :
शहरातील वाहतूक कोडी कमी करण्यासाठी गांधीनगर ते शिवाजी पुल उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला आहे. याचा डिपीआर तयार करा अशा सुचना आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी महापालिकेतील बैठकीत दिल्या. या मार्गावरील युटीलिटी शिफ्टींगचा स्वतंत्र्य डिपीआर महापालिकेने तयार करण्याच्या सुचनाही आमदार महाडिक यांनी दिल्या.
महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये शहरातील उड्डाणपुलाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, सहाय्यक नगररचना संचालक विनय झगडे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता रोहीत तोंदले उपस्थित होते.
आमदार अमल महाडिक म्हणाले, गांधीनगर ते शिवाजी पुल या उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. यानुसार राष्ट्रीय महामार्गच्या वतीने या मार्गाचा सविस्तर आराखडा आणि प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. हा उड्डापुल 10 मीटरचा प्रस्तावीत असून चारपदरी करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा अशा सुचना महाडिक यांनी दिल्या. नागरीकांच्या मालमत्तेस धक्का न लागता याचे डिझाईन तयार करा. शक्य तेथे उड्डाणपुलाची रुंदी कमी करु अशा सुचनाही त्यांनी दिल्या. हा आराखडा 15 दिवसांमध्ये सादर करा. मार्चमध्ये अर्थसंकल्पामध्ये याबाबत निधीची तरतुद करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे जलदगतीने हे काम करावे असेही त्यांनी सांगितले.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी युटीलिटी शिफ्टींगबाबत आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आठ ते दहा दिवसांमध्ये कन्सल्टंट नेमून याचा अहवाल तयार करणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रकांत भर्डे यांनीही उड्डापुलासाठी कन्सल्टंट नेमणून आराखडा तयार करण्यासाठी काम सुरु करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी बैठकीला उपशहर रचनाकार रमेश म्हस्कर, एन. एस. पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता महेश कांझर, राष्ट्रीय महामार्गचे सोहम भंडारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
- पुतळ्यांना कोणतीही बाधा नको
उड्डाणपुलाच्या या मार्गावर छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीर संस्थापिका ताराराणी असे तीन पुतळे येत आहेत. उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करत असताना या तीनही पुतळ्यांना कोणतीही बाधा येवू नये असे प्रस्ताव तयार करा. या पुतळ्यांचे एwतिहासिक महत्व आणि वारसा अबाधीत राहिल याचा विचार करुनच आराखडा तयार करण्याच्या सुचनाही महाडिक यांनी दिल्या.
- मार्गावर 5 ते 6 सबवे होणार
उड्डाणपुल तयार करत असताना या मार्गावर 5 ते 6 सबवे ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरुन शहरात येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना शहरातमध्ये प्रवेश करणे सोपे होईल यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे. दसरा चौक, ताराराणी पुतळा, व्हिनस कॉर्नर येथे शहरात प्रवेश करण्यासाठी मार्ग या उड्डाणपुलावर ठेवण्यात येणार आहेत.
- बालिंगा ते रत्नागिरी मार्गाचाही आराखडा तयार करा
या बैठकीत बालिंगा ते रत्नागिरी या मार्गाचा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली. बालिंगा येथून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक या मार्गाने वळविल्यासह शहरातील वाहतूक कोंडीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. बालिंगा, शिंगणापूर, प्रयाग चिखली येथून हा रस्ता रत्नागिरी मार्गास जोडण्यात येणार आहे.
- अन्य रस्त्यांचीही पाहणी सुरु
जुना पुणे - मुंबई महामार्गाचे रुंदीकरण करणे, शहराभोवतीचे रिंगरोड करणे याचेही नियोजन करावे. पुणे मुंबई मार्गावर दोन ते तीन किलोमीटरचे उड्डाणपुल तयार करणे. शहराभोवतीच्या रिंगरोडची चिंचवाड ते वसगडे ही 1 फेज तयार झाली आहे. उर्वरीत कामासाठी असणारे नियोजन करा. अशा सुचनाही आमदार महाडिक यांनी दिल्या.
- चार पदरी तर काही ठिकाणी दोन पदरी उड्डाणपूल
हा उड्डाणपुल करताना नागरीकांच्या मालमत्तेस कोणताही धोका पोहोचू नये अशा सुचना आमदार महाडिक यांनी केल्या. गांधीनगर ते ताराराणी चौक या मार्गावर चार पदरी करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र ताराराणी चौक ते सिपीआर चौक या मार्गावर दोन पदरी रस्त्याचे नियोजन करा. सिपीआर पासून शिवाजीपुलापर्यंत चार पदरी रस्त्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.