मेन राजारामच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा
कोल्हापूर :
कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या मेन राजाराम हायस्कूलच्या वास्तूस शुक्रवारी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट दिली. या वास्तूचे वेगळेपण पाहून त्यांनी या वास्तूचे जतन, संवर्धन करण्यासाठी तातडीने आराखडा तयार करा अशा सूचना दिल्या .ही वास्तू जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे .
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जुन्या राजवाड्याजवळ असलेली राजप्रसादासारखी ही वास्तू राजाराम महाराज (दुसरे) यांच्या प्रेरणेने उभी राहिली. सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांनीही राज प्रासादाचे क्षण अनुभवत शिक्षण घ्यावे. आधुनिक शिक्षणाची ही दिशा त्यांना मिळावी हा या शाळा उभारणीमागील उदात्त हेतू होता .या वास्तूत शाळा भरली त्यानंतर राजाराम महाविद्यालयाचे कामकाजही काही काळ येथे चालू राहिले पुन्हा तेथे शाळा व ज्युनिअर कॉलेज भरू लागले . पण वास्तूचे कालानुरूप संवर्धन झाले नाही. त्यामुळे शाळेचे क्षण वगळता ही वास्तू कोल्हापूरकरांच्या पर्यटकांच्या नजरेपासून कायम दूरच राहिली.
या वास्तूच्या सद्यस्थितीबद्दल तरुण भारत संवादने दोनच दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. ही वास्तू कोल्हापूरचे वैभव आहे. इतिहास आहे. तो आपण सर्वांनी जपूया असे आवाहन केले होते. आज विभागीय आयुक्त पुलकुंडवार जिल्हा परिषद तपासणीच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते .त्यांनी या वास्तूची पाहणी करूनच आपल्या कामाला सुरुवात केली . त्यांनी इमारतीच्या रचनेची स्वत: वेगवेगळ्या अँगलने छायाचित्रे घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, प्राचार्य गजानन खाडे, विजय ढोणे व पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड उपस्थित होते. उदय गायकवाड यांनी या वास्तूचे वेगळेपण काय आहे याची त्यांना माहिती दिली.