बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात
सर्वजण गुंतले माटोळी, देखाव्यांच्या कामात
पणजी : गोव्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ज्याची ख्याती आहे अशा श्री गणेशोत्सवाला उद्या बुधवारी प्रारंभ होत आहे. यानिमित्त घरोनघरी जोरदार तयारी चालू असून बाजारपेठा ग्राहकांनी खचाखच भरलेल्या आहेत. गणपती चित्रशाळांमध्ये तयार केलेल्या गणेशमूर्ती आपापल्या घरी नेणे चालू झाले आहे. उद्या बुधवारी सकाळी गणेशपूजेला प्रारंभ होईल. युवावर्ग गणपतीसमोरील आरास करण्यात मग्न असून अनेकजण घुमट आरतीच्या तयारीत गुंतलेले आहेत. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत. आज गणेशोत्सवाच्या तयारीसाठी शेवटची खरेदी होईल. काल सोमवारी बाजारपेठांमध्ये सर्वत्र भक्त मंडळींची विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत होती. महिलावर्ग खास करून किराणा दुकानात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करून होत्या. यंदा गतवर्षीच्या तुलनेत नारळाचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्याचबरोबर गणपतीसमोर जी आरास केली जाते त्यासाठीच्या साहित्याचे दर देखील बरेच वाढलेले आहेत. त्याच्या खरेदीसाठी देखील दुकानांमध्ये प्रचंड गर्दी सोमवारी दिसून आली.
आज हरतालिका पूजन
आज हरतालिका पूजन केले जाणार असून उमा महेश्वरीची पूजा केली जाईल. महिलावर्ग आपल्या पतीसाठी हे व्रत करीत असतात आणि त्या एक दिवसाचा उपवासदेखील करतात. गोव्यात गणपतीसाठी उत्साहाचे वातावरण दिसत असून शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे. पुढील पाच दिवस गणेशोत्सवाचे असून दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस असे घरचे गणपती पुजले जातात.
फटाक्यांबाबत जागृती
गेल्या काही वर्षांपासून फटाके वाजवणे बरेच कमी झाले आहे. यावर्षी फटाक्यांचा आवाज अजून थोडा कमी असून जनतेमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. फटाक्याने होणारे प्रदूषण व चतुर्थीनंतर अनेकांचे वाढते आजारपण लक्षात घेऊन यावर्षी फटाके थोडे कमी फोडले जातील, असा अंदाज आहे.
माटोळीचे साहित्य महागले
गेव्यात गणपतीसमोर माटोळी उभारली जाते. या माटोळीसाठी लागणारे पारंपरिक फळफळावळीचे दर यावर्षी बरेच वाढलेले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्सव हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारा ठरतो. गोव्यात सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा होत असून जवळपास दीडशे सार्वजनिक गणपती गोव्यात बसविले जातात. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भव्य असे मंडप उभारलेले आहेत. देखाव्यांचे काम देखील सुरू आहे. आज घरोघरी गणपतीसमोर आरास उभारण्यासाठी युवामंडळी रात्रभर जागरण करतील आणि उद्या सकाळपर्यंत संपूर्ण आरास तयार होईल. गोव्यातील गणेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे गणरायाच्या डोक्यावर बांधलेली माटोळी आणि गणपतीसमोर करण्यात येणारे खास देखावे. तसेच घुमट आरती हा गोव्यातील एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम असून त्यामध्ये युवा पिढी मोठ्या संख्येने सहभागी होत असताना दिसून येते.