अनगोळ येथे गणेशोत्सवाची जय्यत तयारी
उद्या होणार आगमन सोहळा
बेळगाव : अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची तयारी अनगोळ उपनगरात मोठ्या उत्साहात सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून अनगोळ गावातील अनेक मंडळांनी आपले मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ही गोकुळ अष्टमीला करण्यात येत असे पण आता ही मुहूर्तमेढ एखादा चांगल्या दिवसापासून आपल्या गल्लीत धुमधडाक्यात आयोजित करण्यात येत आहे. मंडळाचे कार्यकर्ते आपल्या भागात फिरून गणेशोत्सवासाठी वर्गणी जमा करण्यासाठी फिरताना दिसत आहेत तसेच मंडळाचा मागील वर्षाचा जमा-खर्चाचा अहवाल, आरती संग्रह देत आहेत. तर रात्री पुन्हा मंडपात उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे.
घरगुती गणपतींच्या सजावटीची तयारी जोमात
गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवात हालते, सजीव, सामाजिक संदेश, देशभक्तीपर, पौराणिक कथा, समाज कल्याणकारी, असे अनेक देखावे सादर करण्यात कांही मंडळे अग्रेसर असायची पण ही परंपरा आता खंडित होताना पहावयास मिळत आहे. ही परंपरा आता घरगुती गणपती देखाव्यात पहावयास मिळत आहे. याची तयारी अनेक गणेश भक्तांनी कांही दिवसांपासून सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. अनगोळ भागात घरोघरी अनेक ऐतिहासिक देखावे हालते देखावे मंदिरे शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करण्यात येत आहेत त्याची तयारी जोरदारपणे सुरू झाली आहे. मागील वर्षीही अनगोळ भागात अनेक देखावे सादर केले होते. हनुमान जयंती गाड्याची यात्रा, बैलगाडी शर्यतीचा थरार, असे अनेक नेत्रदीपक देखावे पहावयास मिळाले. पण गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तयारीचा वेग मंदावल्याचे पहावयास मिळत असले तरी तयारीला सुरुवात झाली आहे.
अनगोळ येथील अनेक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने रविवार दि. 24 रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा आयोजिला आहे. यात सार्वजनिक गणेशोत्सव श्रीराम युवक मंडळ राजहंस गल्ली, विद्यानगर गणेशोत्सव मंडळ, भांदूर गल्ली गणेशोत्सव मंडळ, मराठा चौक गणेशोत्सव मंडळ, शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ, तसेच कोनवाळ गणेशोत्सव मंडळ या मंडळांच्या गणेशमूर्तींचा आगमन सोहळा रविवारी सायंकाळी आयोजिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ या मंडळाचा आगमन सोहळा बाबले गल्ली येथून सुरू होणार आहे तर उर्वरित मंडळाचा आगमन सोहळा हा अनगोळ मुख्य रोडमार्गे सुरू होणार आहे. यासाठी सर्वच मंडळाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.