हिवाळी अधिवेशनाची तयारी जोमाने
8 डिसेंबरला अधिवेशनाला सुरुवात : स्थापन केलेल्या समित्या लागल्या कामाला
बेळगाव : सुवर्णसौधमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तयारीला जेर आला आहे. 8 डिसेंबरला अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अद्याप 15 दिवस असले तरी आपली जबाबदारी चोखपणे पार पडावी या विचाराने अधिवेशनच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या समित्या कामाला लागल्या आहे. मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, माध्यम प्रतिनिधी असा गोतावळा 8 डिसेंबरपासून बेळगावात जमणार आहे. त्यांच्यासाठी उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक, किनारपट्टी भागात मिळणाऱ्या जेवणातील मेन्यू तयार करण्यासाठी कर्मचारी कंबर कसून कामाला लागले आहेत. अधिवेशनासाठी जमलेल्यांना दुपारचे जेवण सुवर्णसैधच्या बँक्वेट हॉलमध्ये देण्यात येणार आहे. जेवणामध्ये त्यांच्या भागात मिळणाऱ्या पदार्थाबरोबरच बेळगाव, म्हैसूर, किनारपट्टी, गुलबर्गा य़ेथे मिळणाऱ्या गोड पदार्थांचा समावेश असेल.
अधिवेशासाठी येणाऱ्यांची 60 ठिकाणी निवासाची व्यवस्था
यासंबंधी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. विविध भागात मिळणाऱ्या पदार्थांचे वेगवगळे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्यांची विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ, सरकारच्या विविध खात्यांची वसतिगृहे, सरकारी विश्रामधाम, खासगी रेस्टॉरन्ट, लॉज यासह 60 ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे . एकूण सुमारे 4 ते 5 हजारांच्या संख्येत असणाऱ्यांना या मंडळींना दुपार व रात्रीचे जेवण तसेच तीनवेळा उपाहार देणे. उपाहारात कोणते पदार्थ द्यायचे याबाबत चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष व सभापतींच्या अनुमतीची प्रतीक्षा करण्यात येत असल्याचे समजते.
ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, नाचण्याच्या पिठाचे गोळे (रागीमुद्दी), तांदळाच्या भाकरी, तंदूर रोटी, भाज्या, उसळ, पांढरा भात, पुलाव, व्हेज बिर्याणी, मसाले भात, सार, कढी, आमटी, सांडगे, पापड, लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या, दही, साबुदाण्याची खीर, रव्याची खीर, शेंगाची पोळी, पुरणपोळी, गाजराचा हलवा, बालुशा, गुलाब जामून, म्हैसूरपाक, मोतीचूर लाडू अशा नानाविध खाद्यपदार्थांचा जेवणात समावेश राहणार आहे.
पोलिसांसाठी तंबू उभारण्याचे काम सुरू
अधिवेशन 19 डिसेंबरपर्यंच चालणार असून 13 व 14 डिसेंबर हे दोन दिवस वगळता बाकीचे 10 दिवस सभागृहाचे कामकाज? चालणार आहे. अधिवेशन काळात विविध संघटनांचे मोर्चे, आंदोलने होत असतात. कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने यंदाच्या अधिवेशनासाठी सुमारे 8,800 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या अधिवेशनासाठी 6 हजार पोलीस तैनात होते. यंदा जादा अडीच हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी असतील. पोलिसांसाठी तंबू उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. पोलिसांनाही रोजच्या उपाहार व भोजनातून विविध खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत. सकाळी आणि रात्री चहा, कॉफी, दूध यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.