दीक्षांत समारंभाची तयारी गतीमान
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शुक्रवार 17 जानेवारी रोजी राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख पाहुणे पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा संचालक डॉ. आशिष लेले आहेत. विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहातील दीक्षांत समारंभात गोल्ड मेडल व पीएच. डी. आणि एम. फिल.च्या प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठात जय्यत तयारी सुरू असून मंडप व पदवी प्रमाणपत्र स्टॉलची उभारणी सुरू आहे. गुरूवार 16 रोजी ग्रंथमहोत्सव होणार असल्याने स्टॉल नोंदणीला वेग आला आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार दीक्षांत समारंभाला कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक, डीन आणि प्रमुख पाहुणे यांनी पांढरा पायजमा व कुर्ता तर महिलांनी मोती कलरची साडी त्यावर जॅकेट, गळ्यात मानवस्त्र परिधान करायचा आहे. या सर्व गोष्टींची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मंडप उभारणी सुरू असून प्रत्येक शाखेनुसार पदवी प्रमाणपत्र वितरण करण्याचे स्टॉल उभारले आहेत. तसेच ग्रंथ व खाद्य पदार्थांच्या विक्रीचे स्टॉल तयार करण्यात येणार आहेत.
विद्यापीठ प्रशासनाकडून दीक्षांत समारंभाच्या कामासाठी विविध प्रकारच्या समित्या स्थापन करून प्रत्येकाला काम वाटून दिली आहेत. प्रत्येक कमिट्यांच्या बैठकांना वेग आला असून, दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे.