‘ज्येष्ठा गौरी’च्या आगमनाची तयारी
उद्या पूजन; पूजा साहित्याची खरेदी
प्रतिनिधी/ बेळगाव
गणरायापाठोपाठ गौराईचे आगमन होते. गौराई म्हणजे घरोघरची लाडकी लेकच होय. तिच्या आगत-स्वागतामध्ये कोणतीही उणीव राहू नये, यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. यंदा काही घरांमध्ये रविवारी गौराईचे आगमन होणार आहे. काही ठिकाणी शनिवारीच गणरायाशेजारी गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गौरी आणण्याच्या अनेक पद्धती आहेत. गौरीची झाडे घेऊन नदी, ओढे, पाणवठे यासारख्या ठिकाणावरून गैरी घरी आणल्या जातात. गौरीची झाडे एकत्र बांधून ती तांबे, पितळ, स्टील अशा प्रकारच्या तांब्यांमध्ये खोवली जातात. हळद-कुंकू लावून त्यांना घरी आणले जाते. सौभाग्यवाण अर्पण करून गौरीची प्रतिष्ठापना करण्यात येते.
ज्येष्ठा गौरी घरी आणण्याच्या निमित्ताने घरातील जमिनीवर पिवडीने गैरीची पाऊले काढली जातात. बाजारपेठेत गैरीच्या पावलांचे स्टीकर मिळत असले तरी आजही ज्येष्ठ महिला पिवडीने म्हणजेच दूध व हळद एकत्र करून गौरीची पाऊले रेखाटणे पसंत करतात. ज्येष्ठा गौरीचे पूजन जसे घरांमध्ये तसे सार्वजनिक गणेश मंडपांतूनही होत असते. सार्वजनिक स्थळांवरही महिलांकडूनच गौरी आणल्या जातात. सोमवार दि. 1 रोजी ज्येष्ठा गैरीचे घरोघरी पूजन होणार आहे. गौरीची प्रतिकृती तयार करून तिला शालू, पैठण यासारखी साडी नेसवली जाते. मुखवटा बसवून साजश्रृंगार केला जातो. श्रावणमासातील गौरीबरोबर ज्येष्ठा गौरीचे पूजन करून पुरणाचे कडबू, अंबोडे, भजी, मसाले भात, कटाची आमटी यांचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी हळदी-कुंकू होते.
गौरीचे कथावाचन, गाणी म्हणणे, उखाणा घेणे, घागरी फुंकणे, झिम्मा-फुगडी असे मनोरंजन करीत महिला जागरण करतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गणेश मूर्तीबरोबर ज्येष्ठा गौरीचेही विसर्जन केले जाते. ज्येष्ठा गौरी आगमनाच्या निमित्ताने गैरीची झाडे, कमळ, गुलाब, चाफा, कणेरी यासाखी फुले, दुर्वा, केवडा, वाळूक, केळीची पाने, विविध प्रकारच्या फुलांचे हार बाजारात शनिवारी सकाळपासून दाखल झाले होते.
पाच दिवसांच्या गणरायाचे आज विसर्जन
पाच दिवसांच्या गणरायाचे रविवार दि. 31 रोजी विसर्जन होणार आहे. महापालिकेने श्रीमूर्ती विसर्जनासाठी शहर आणि उपनगरे अशा एकूण 9 ठिकाणी व्यवस्था केली आहे. त्याशिवाय फिरते कुंडही सुरू केले असल्याने गणेशभक्तांची सोय झाली आहे.