For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तयारीला वेग

12:09 PM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तयारीला वेग
Advertisement

शिवभक्तांमध्ये सळसळता उत्साह : सजीव देखाव्यावर भर, पात्र निश्चितीचे काम सुरू 

Advertisement

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व प्रेम पहावे तर ते बेळगावमध्येच, असे खुद्द महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी गौरवाने सांगतात. बेळगावच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यामध्ये बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा समावेश होतो. सजीव देखावा, हुबेहुब प्रसंग, शिवभक्तांमध्ये सळसळता उत्साह, बेळगावमध्ये पाहायला मिळत असल्याने या चित्ररथ मिरवणुकीला एक वेगळेचे महत्त्व आहे. यावर्षीही मोठ्या उत्साहात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार असून, त्यासाठी शिवजयंती मंडळे तयारीला लागली आहेत.

देखावे पाहण्यासाठी कोल्हापूर, गोवा येथूनही शिवभक्त शहरात

Advertisement

बेळगावमध्ये शहरासह शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ येथील 50 ते 60 शिवजयंती उत्सव मंडळे सजीव देखावे सादर करतात. शिवकालीन देखाव्यांसोबत सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे देखावे पाहण्यासाठी बेळगावसह कोल्हापूर, गोवा येथूनही शिवभक्त शहरात येत असतात. मागील वर्षी निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शिवजयंती उशिराने झाली. त्यातच पावसामुळे शिवप्रेमींचा हिरमोड झाला होता.

मिरवणूक तारीख लवकरच जाहीर

यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार आहे. अद्याप मध्यवर्ती शिवजयंती मंडळाची बैठक झाली नसली तरी लवकरच चित्ररथ मिरवणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. अवघे 15 ते 20 दिवस शिल्लक राहिल्याने मंडळे मात्र तयारीला लागली आहेत. देखाव्यासाठी पात्रे ठरविणे, ड्रेसची ऑर्डर देणे, वाहनांच्या चेस्सी बुकींग करणे, साऊंड, लाईट्स यांना अॅडव्हान्स देण्याचे काम मंडळांकडून सुरू आहे. त्यामुळे यावर्षीही बेळगावमध्ये मोठ्या थाटात चित्ररथ मिरवणूक काढण्याची तयारी युवक मंडळांकडून सुरू आहे.

2008 पासून देखावा सादर

युवक मंडळाच्या माध्यमातून 2008 पासून देखावा सादर केला जात आहे. यापूर्वी बाजीप्रभू देशपांडे, सोन्याचा नांगर यासारखे अप्रतिम देखावे मंडळाने सादर केले आहेत. यावर्षी लहान मुले व तरुणाईला सामावून घेऊन देखावा तयार केला जाणार आहे. यामध्ये महिलांचाही समावेश असेल. सध्या दोन ते तीन प्रसंग निश्चित करण्यात आले असून त्यातील एक प्रसंग निवडला जाणार आहे.

- अरुण पाटील (स्वराज्य सेना, युवक मंडळ अखंड फुलबाग गल्ली)

शिवप्रेमींकडून जय्यत तयारी सुरू

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अवघ्या काही दिवसांवर आल्याने शिवप्रेमींकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मागील 25 वर्षांपासून सजीव देखावा सादर करण्यात येत आहे. त्यापूर्वी एकाच ठिकाणी देखावा सादर केला जात होता. येत्या दोन दिवसांत प्रसंग निश्चित करून सरावाला सुरुवात केली जाणार आहे. केवळ पात्रच नाही तर यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या चेस्सी, लाईट, साऊंड, यासह इतर सर्वांचे बुकींग सुरू झाले आहे.

- श्री चौगुले (धर्मवीर संभाजी युवक मंडळ, ताशिलदार गल्ली)

Advertisement
Tags :

.