पीओपी गणेशमूर्ती बंदीच्या अंमलबजावणीसाठी सज्जता
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ बनले आक्रमक : शहरांसह गावांतील चित्रशाळांची होणार तपासणी
पणजी : राज्य सरकारने पीओपी मूर्ती विक्रीवर रोख आणताना राज्याच्या सीमांवर कडक तपासणी करण्यात यावी, असे आदेश अबकारी आणि वाहतूक विभागांना दिलेले आहेत. याशिवाय नगरपालिका आणि पंचायतींना आपल्या हद्दीतील चित्रशाळांची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करावी, असेही निर्देश दिले आहेत. पर्यावरण विभागाच्या या आदेशाचे ज्यांच्याकडून उल्लंघन होईल, त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, असे विविध सरकारी खात्यांना सरकारने निर्देश दिलेले आहेत. गणेशचतुर्थी उत्सव अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला असून भाविकांना प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) मूर्ती विकल्या जाऊ नयेत, यासाठी राज्यभरातील गणेशमूर्ती चित्रशाळांची तपासणी सरकारी अधिकारी करणार आहेत. त्यामुळे विविध सरकारी खात्यांचे अधिकारी सध्या ‘अॅक्शन मोड’वर आलेले आहेत.
येत्या 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा हस्तकला महामंडळ व उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चित्रशाळांची तपासणी करण्यात येणार आहे. पीओपी मूर्ती विक्री करताना कुणी आढळल्यास संबंधित चित्रशाळांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय पीओपी मूर्तीही अधिकारी जप्त करणार आहेत. पीओपीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाला हानी पोहचणार आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होणार असल्याने अशा मूर्ती विक्रीला आळा घालण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी चित्रशाळांची तपासणी करण्याचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारनेही पीओपी मूर्ती विक्री, उत्पादन आणि आयातीवरही बंदी घालण्याचे निर्देश संबंधित खात्यांना दिलेले आहेत. राज्याच्या सीमांवर कडक तपासणी करण्यात येणार असून, पीओपी मूर्तीची वाहतूक करणाऱ्या वाहने अडवून त्यांच्यावर कारवी करण्यात यावी, असे निर्देश सरकारने दिलेले आहेत.