‘इफ्फी’ची तयारी जोरात
उद्योग प्रसार, फिल्ममेकरांना मिळणार अनेक संधी : नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स या बाबींवर राहणार विशेष भर
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार असल्याने जय्यत तयारीला सुरवात झाली आहे. यावर्षीचा विशेष कार्यक्रम म्हणजे ‘कन्टेंट क्रिएशन’ आणि ‘उद्योजकता’ या दोन्ही अंगांना पुढे घेऊन जाणारा आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था व मनोरंजन उद्योग दोन्हीला चालना मिळण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या इफ्फी महोत्सवात उद्योग-प्रसार, नवोदित फिल्ममेकरांना संधी, नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. या सोबत ‘वेव्हस फिल्म बाजार’ (पूर्वीचा फिल्म बाजार) हा कन्टेन्ट क्रिएशन मार्केटमध्ये भारताची जागतिक स्थिती मजबूत करण्याचा उपक्रम सुरू आहे.
प्रवेशद्वार, क्रीनिंग हॉल्स, पार्श्व कार्यक्रम, दृश्य-प्रसार अशा बाबतीत स्थानिक व्यवस्थापन जोरदार काम करत आहे. गोव्याच्या पर्यटन व सेवा क्षेत्रालाही या कार्यक्रमामुळे चांगली संधी मिळेल, अशी तयारी यंदा करण्यात आली आहे. माध्यमीय (मीडिया) कर्मचाऱ्यांसाठी अॅक्रिडिटेशन प्रक्रिया सुरू झाली असून, ह्या नोंदणीची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर 2025 ठेवण्यात आली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने रंगरंगोटी आणि सुशोभीकरण कामाने वेग घेतला नसला तरी मंडप उभारणे, आयनॉक्स थिएटरसमोर महत्त्वाची कामे सुरू आहेत. पावसाळा संपल्यानंतर पणजीतील मुख्य रस्ते, रस्त्यांच्या बाजूला असलेले दुभाजक याशिवाय ऐतिहासिक स्थळे यावर इफ्फीचे महत्त्व वाढविणाऱ्या कलाकृतीच्या कामाला वेग येणार आहे. अनेक कारागीर इफ्फीच्या तयारीसाठी गुंतल्याचे आतापासूनचे चित्र आहे.
पर्यटक वाढण्याची शक्यता
स्थानिक निवास, प्रवासाबाबत वाहने आधीपासून बुक करून ठेवणे योग्य होणार आहे. कारण इफ्फी महोत्सवामुळे नोव्हेंबरमध्ये गोव्यात पर्यटक संख्या वाढू शकते. महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अंतिम वेळापत्रक, फिल्म-क्रीनिंग्स, मास्टरक्लास एका स्थानिक पोर्टलवर प्रकाशित होतील. याकडेही विशेष लक्ष राहणार आहे. नेटवर्किंगचा कार्यक्रम, इंडस्ट्री मेळावे यांचा पूर्ण लाभ घेता यावा, यासाठी आयोजकांनी यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नातून राज्यात सुरू झालेला इफ्फी महोत्सव हा भारतातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे, ज्यातून भारतासह जगभरातील चित्रपट-कलाकार, निर्माता, उद्योग लोक एकत्र येतात आणि त्याचा आज राज्याला फायदा होताना दिसत आहे.
‘इफ्फी’च्या उद्घाटनाची जागा बदलाची शक्यता
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर उघडला जातो. परंतु यंदा ही जागा बदलण्याची शक्यता आहे. याबाबत बैठकांमधून चर्चाही होत असल्याचे समजते. यंदा 20 नोव्हेंबर रोजी ‘इसी परेड’ म्हणजे कार्निव्हल, शिमगोत्सवाचे सादरीकण होईल. फेरीबोट पॉईंट ते आयनॉक्ससमोरील इएसजीच्या परिसरात ‘इसी परेड’ होणार आहे. इफ्फीचा समारोप सोहळा मात्र श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होण्याची दाट शक्यता असून, तशी माहिती खास गोपनीय सूत्रांनी दिली.
काय नवीन आणि काय आहे खास
- सुकाणु समिती : याबाबतीत समितीचे सदस्य वाढवून 16 ते 31 केले आहेत. ज्यात चित्रपट-उद्योग, मीडिया, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध व्यक्तींचा समावेश आहे. युथ आणि नवोदित फिल्ममेकरांसाठी मास्टरक्लासेस, उद्योग कार्यशाळा, नेटवर्किंग सेशन्स यांचा समावेश करून कार्यक्रमाची रूपरेषा विकसित केली आहे.
- इंडियन पॅनोरमा : या विभागासाठी प्रवेश नियम प्रकाशित करण्यात आले आहेत. ज्यात फी ‘शुल्कमुक्त’ ठेवण्यात आली असून, नवोदित दिग्दर्शकांना विशेष संधी मिळेल.
- स्थानिक व व्यवस्थापनातील तयारी : प्रवेशद्वार, क्रीनिंग हॉल्स, पार्श्व कार्यक्रम, दृश्य-प्रसार अशा बाबतीत स्थानिक व्यवस्थापन जोरदार काम करत आहे गोव्याच्या पर्यटन व सेवा क्षेत्रालाही या कार्यक्रमामुळे चांगली संधी मिळेल अशी सध्याची तयारी आहे.