कारवार जिल्ह्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी
काही गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तींचे मंडपात आगमन : एक गाव एक गणपतीचा उपक्रम हाती
कारवार : गणेशोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपल्याने संपूर्ण कारवार तालुक्यातील वातावरण गणेशमय बनून राहिले आहे. कारवार तालुक्यात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा केला जातो. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाची लगबग आणि धावपळ सुरू झाली आहे. कारवार नगरासह अलीकडच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे लोन तालुक्यातील प्रत्येक खेड्यात पोहोचले आहे. तालुक्यातील एखाद्या दुसऱ्या गावांचा अपवाद वगळता सर्वत्र एक गाव एक गणपतीचा उपक्रम हाती घेतला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव व मंडळाच्याकडून मंडप उभारणीचे कार्य यापूर्वीच पूर्ण झाले आहे.
काही गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तींचे मंडपात आगमन ही झाले आहे. आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सजावट, विद्युत रोषणाई आणि उत्सवाच्या दरम्यान हाती घेण्यात येणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांच्या नियोजनाला वाहून घेतले आहे. कारवार तालुक्यातील बहुतेक घरगुती गणपती दीड दिवसाचे असतात. दीड दिवसांचा गणेशोत्सव असला तरी तयारीला कोणत्याही प्रकारचा तोटा नसतो. घरगुती गणेशोत्सव असलेल्या कुटुंबीयांकडून साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई, माटोळी, प्रसाद, महाप्रसादाची तयारी सुरू आहे. कारवार तालुक्यातील हजारो नागरिक नोकरी, रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने गोवा, मुंबई, पुणे, बेंगळूर, बेळगाव व हुबळी, धारवाड आदी ठिकाणी वास्तव्य करून आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे नागरिक आपल्या मूळगावी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे कारवार तालुक्यातील प्रत्येक गाव नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेले आहे.
आठवड्याच्या बाजारपेठेत मोठी गर्दी
आज येथे आठवड्याच्या बाजारात गणेशप्रेमींनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. श्रींची आरास सजावटीसाठी लागणारी तोरणे, फुलांच्या माळा, पडदे, इलेक्ट्रॉनिक्स तोरणे, रंगीबेरंगी पडदे, विविध प्रकारचे लाईट्स, प्रसादाचे, महाप्रसादाचे साहित्य, फळाफळावळे खरेदी करण्यासाठी गणेशप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान भारतीय हवामान खात्याने कारवार तालुक्यात 27 ते 29 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्टची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व कारवार तालुकावासियांचे बळीराजांकडे लक्ष लागून राहिले आहे.
कार्यशाळामध्ये लगबग सुरू
कारवार तालुक्यात असे एकही गाव नसावे जेथे सुबक आणि आकर्षक मूर्त्या तयार केल्या जात नाही. मूर्तिकारांचे गाव म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सदाशिवगडमध्ये अनेक कुशल मूर्ती कलाकार आहेत. येथे साकारण्यात येणाऱ्या मूर्त्यांना गोवा, हुबळी, धारवाड, दावणगिरी आदी ठिकाणी मोठी मागणी असते. सदाशिवगड येथील आचारीवाडा तर मूर्तिकारांचा वाडा म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवित आहेत. काही मूर्तिकारांना तर दिवसाचे चोवीस तास अपुरे पडत आहेत. असे सांगण्यात आले.