मतमोजणी तयारीला वेग ; जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदारांचे आभार
कोल्हापूर :
सर्व दहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी त्या त्या ठिकाणी 14-14 टेबल असणार आहेत. मात्र कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले येथे 16-16 मतमोजणी टेबल असणार आहेत.
जिल्हयात सर्व मिळून 176 मतमोजणी निरीक्षक, 186 मतमोजणी सहायक तर 196 मायक्रो ऑब्जर्व्हर असणार आहेत. पोस्टल मतमोजणीसाठी 10 मतमोजणी केंद्रांमध्ये मिळून 130 टेबल असणार आहेत. त्यासाठी 154 मतमोजणी निरीक्षक, 308 मतमोजणी सहायक तर 154 मायक्रो ऑब्जर्व्हर असणार आहेत. ईटीपीबीएस मतमोजणीसाठी जिह्यात 50 टेबल असून 105 मतमोजणी कर्मचारी असणार आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि वेळेत संपविण्यासाठी नियोजन केले आहे.
बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्व ठिकाणी मतदारांनी शांततेत आणि उत्साहाने सहभाग नोंदविला. काही ठिकाणी मतदान यंत्रात बटण प्रेस न होणे, क्लॉक एरर अशा कारणांनी 19 बॅलेट युनिट, 23 कंट्रोल युनिट व 29 व्हीव्हीपॅट वेगवेगळ्या ठिकाणी बदलण्यात आले. मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात सायंकाळी उशिरापर्यंत पहायला मिळाली. मतदान संपण्याच्या कालावधीवेळी 6 वाजल्या नंतरही दोनशेहून अधिक मतदान केंद्रात रांगा पाहायला मिळाल्या. सर्व उपस्थित मतदारांना टोकन देऊन त्यांचेही मतदान उशिरापर्यंत थांबून घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने नागरिक, विद्यार्थी, मतदार यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती अभियान राबविले, त्याचाच परिणाम एकुण झालेल्या मतदान टक्केवारीत दिसून आला. उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असलेल्या मतदान केंद्रावरील सुरक्षिततेची काळजी घेत सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये आणण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर सर्व 10 स्ट्राँग रूममध्ये तिहेरी सुरक्षेत सर्व मतदान यंत्र बंद करण्यत येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.