अमेरिकन क्षेपणास्त्र निर्मितीची तयारी
भारतात होणार सह-उत्पादन : रशियन रणगाड्यांचा काळ ठरलेले अत्याधुनिक क्षेपणास्त्र
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
युक्रेनच्या सैन्याने अमेरिकेकडून प्राप्त रणगाडाभेदी निर्देशित क्षेपणास्त्र ‘जेवलिन’चा वापर करत रशियन रणगाड्यांना उद्ध्वस्त केले हेते. आता भारत या क्षेपणास्त्राची निर्मिती अमेरिकेसोबत मिळून करू इच्छित आहे. भारताने अमेरिकेला जेवलिन रणगाडाविरोधी निर्देशित क्षेपणास्त्राच्या (एटीजीएम) संयुक्त उत्पादनासाठी औपचारिक स्वरुपात एक ‘लेटर ऑफ रिक्वेस्ट’ पाठविले आहे. दोन्ही देशांदरम्यान जेवलिन रणगाडाविरोधी निर्देशित क्षेपणास्त्राच्या संयुक्त उत्पादनावरून दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती आणि आता भारताने अधिकृत स्वरुपात पत्र पाठविले आहे.
भारत मेक इन इंडिया अंतर्गत या क्षेपणास्त्राची निर्मिती करू इच्छितो, हे क्षेपणास्त्र लाँचरद्वारे एक सैनिकही सहजपणे डागू शकतो. याचमुळे या क्षेपणास्त्राला रणगाड्यांचा काळ संबोधिले जाते. जेवलिनला अमेरिकेच्या अत्याधुनिक थर्ड जनरेशनचे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र मानले जाते. रशियाने युद्धाच्या प्रारंभी युक्रेनमध्ये शेकडो रणगाडे युक्रेनमध्ये घुसवल्यानंतर अमेरिकेने ही क्षेपणास्त्रs युक्रेनला सोपविली होती. युक्रेनचे सैनिक अत्यंत सहजपणे या क्षेपणास्त्रांच्या मदतीने रशियाच्या रणगाड्यांना लक्ष्य करत होते. यामुळे रशियाला युद्धभूमीवरून रणगाड्यांना हटवावे लागले होते.
जेवलिन क्षेपणास्त्र प्रणाली टॉप-अटॅक क्षमतेसाठी ओळखली जाते. म्हणजेच शत्रूच्या रणगाड्याला वरील भागातून लक्ष्य करत नष्ट करते. रणगाड्याचा हा हिस्सा सर्वात कमकुवत असतो, यामुळे रणगाडा सहजपणे नष्ट होतो. जमिनीवरील संघर्षावेळी हे क्षेपणास्त्र अत्यंत प्रभावी ठरले आहे.
भारताकडून प्रयतन
भारताच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने अमेरिकेला पत्र पाठविल्याची पुष्टी दिली आहे. यासंबंधी करार झाल्यास भारताची विदेशी शस्त्रास्त्रांवरील निर्भरता कमी होणार आहे आणि भारत स्वत:च्या आवश्यकतेनुसार रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचे उत्पादन करू शकणार आहे. यासंबंधीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आपत्कालीन खरेदीच्या अंतर्गत क्षेपणास्त्रांच्या खरेदीपूर्वी पासून अमेरिकेच्या संपर्कात भारत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. भारताचे सैन्य पर्वतीय आणि दुर्गम भागांमध्ये तैनात सैनिकांसाठी ही क्षेपणास्त्र प्रणाली इच्छित आहे.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यासोबत चर्चा केली होती. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण सहकार्य वाढविण्यावरून चर्चा झाली होती. दोन्ही देशांदरम्यान यापूर्वीच जीई-414 जेट इंजिन भारतात निर्माण करण्याच्या करारावरून चर्चा झाली आहे. आता जेवलिन क्षेपणास्त्रांच्या सह-उत्पादनामुळे संरक्षण भागीदारीला नवा वेग मिळण्याची अपेक्षा आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती अमेरिकेच्या रेथियॉन आणि लॉकहीड मार्टिन या कंपन्यांकडून मिळून केली जाते. हे क्षेपणास्त्र नाटो देशांच्या सैन्यासाठी एक आकर्षक शस्त्र राहिले आहे.
जेवलिन क्षेपणास्त्राची क्षमता
जेवलिन क्षेपणास्त्राची क्षमता ही फायर-अँड-फॉरगेटची आहे, म्हणजेच एकदा टार्गेट लॉक केल्यावर ऑपरेटरला तेथेच थांबून रहावे लागत नाही. हे क्षेपणास्त्र खांद्यावरून डागता येणारा रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. याचे वजन सुमारे 22 किलो असून लांबी सुमारे 1.1 मीटर आहे. याचा मारक पल्ला 65 मीटरपासून 2.5 किलोमीटरपर्यंत आहे. तर याच्या नव्या वेरियंटचा मारक पल्ला 4 किलोमीटरपर्यंत आहे. हे क्षेपणास्त्र हार्ड एक्स्प्लोसिव्ह फायर करू शकते आणि याचा वेग मॅक-सबसोनिक स्वरुपाचा आहे. तर याच्या प्रति यूनिटची किंमत 1 लाख 75 हजार ते 2 लाख 50 हजार डॉलर्सदरम्यान आहे. भारतात याची निर्मिती झाल्यास याची किंमत आणखी कमी होऊ शकते.