For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी तयारी

11:31 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी तयारी
Advertisement

पोलिंग एजंट नेमणूक प्रक्रियेला गती

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी दि. 7 मे रोजी मतदान घेण्यात आले आहे. यानंतर मतदान यंत्रे सीलबंद करून स्ट्राँगरूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार आता सर्वांनाच मतमोजणीची उत्सुकता लागून राहिली आहे. मतमोजणीसाठी निवडणूक विभागाकडून तयारी केली जात आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या 8 विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 24 तास नजर आहे. निवडणूक विभाग आता मतमोजणीच्या तयारीच्या कामात गुंतला आहे. दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून विविध राजकीय पक्षांसह अपक्ष अशा 13 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार टेबल लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आठ विधानसभा मतदारसंघांसाठी 112 टेबल लावण्यात येणार आहेत. याबरोबरच निवडणुकीला उभारलेल्या उमेदवारांना मतमोजणी दरम्यान पोलिंग एजंट नेमणूक करण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. त्याप्रकारे प्रत्येक टेबलला एक एजंट नेमणूक केला जाणार आहे. उमेदवारांना पोलिंग एजंट नेमण्यासाठी संबंधितांची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. एजंटांची माहिती घेऊन ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबरोबरच पोस्टल मतदान मोजणी करण्यासाठीही नियोजन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.