युएईत प्रीमॅरिटल जेनेटिक टेस्टिंग अनिवार्य
आईवडिलांना मधूमेह- उच्च रक्तदाब असल्यास मुलांसाठी वाढती जोखीम
संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) सरकारने आरोग्यावरून मोठा निर्णय घेतला आहे. तेथील आरोग्य विभागाने ‘प्रीमॅरिटल जेनेटिक टेस्टिंग’ला अनिवार्य पेले आहे. या नियमाच्या अंतर्गत युएईमध्ये विवाह करण्यापूर्वी जोडप्याला जेनेटिक टेस्टिंग करविणे अनिवार्य असेल. आगामी पिढ्यांच्या हिताकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. आईवडिलांच्या जेनेटिक आरोग्याबद्दल कळावे आणि कुठलाही जेनेटिक डिसऑर्डर मुलांना होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालकांकडून खास डीएनए सीक्वेंसिंग किंवा क्रोमोजोम्सची संरचना अपत्यांना मिळते. यात असलेल्या जीनद्वारे आमचा रंग, रुप, रचना, सवयी आणि वर्तन कसे असेल हे निश्चित होते. हे सर्वकाही जीनचे एक्स्प्रेशन असते. जर यात काही डिफेक्ट किंवा म्युटेशन झाले तर आगामी पिढ्यांनाही ते पास ऑन होते. यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार किंवा समस्या होऊ शकतात. बहुतांश प्रकरणांमध्ये तर यावर कुठलाच उपचार नसतो आणि शिशूचा मृत्यू होत असतो.
जेनेटिक आजार आरोग्य व्यवस्थेसाठी दीर्घकाळापासून आव्हान ठरले आहेत. या आजारांवरील वैज्ञानिक संशोधन वाढल्यावर जेनेटिक आजार रोखता येणे शक्य असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून जगातील अनेक देशांमध्ये नियम देखील तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार विवाहापूर्वी जेनेटिक टेस्टिंग अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या देशांमध्ये जेनेटिक आजारांचे प्रमाण अधिक होते तेथे विशेषकरून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
जेनेटिक टेस्टिंग म्हणजे काय?
जेनेटिक टेस्टिंग एकप्रकारची वैद्यकीय चाचणी आहे. याच्या माध्यमातून जीन, क्रोमोजोम्स किंवा प्रोटीनमध्ये झालेल्या परिवर्तनाचा शोध लावला जातो. याच्या निष्कर्षातून तीन मोठ्या गोष्टींची माहिती मिळते. कुठल्याही व्यक्तीला एखादी संशयास्पद जेनेटिक कंडिशन आहे की नाही हे यातून कळते. भविष्यात जेनेटिक डिसऑर्डर विकसित होण्याची कितपत शक्यता आहे हे देखील यातून समोर येते. कुठल्याही व्यक्तीद्वारे मुलांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर पास ऑन होण्याची किती शक्यता आहे हे यातून समजते. सद्यकाळात 77 हजारांहुन अधिक जेनेटिक टेस्टिंग होत आहेत. यावर अद्याप आणखी संशोधन सुरू आहे.
प्रीमॅरिटल जेनेटिक टेस्टिंग आवश्यक का?
विवाहापूर्वी विशेषकरून गर्भधारणेपूर्वी जेनेटिक टेस्टिंग अत्यंत आवश्यक आहे. चीन आणि भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये जेनेटिक कंडीशन्स असण्याची शक्यता आहे. ही कंडिशन्स मुलांमध्ये पास ऑन होऊ शकते. जर आईवडिलांपैकी एखाद्यात गंभीर जेनेटिक कंडिशन असेल तर मुलांमध्ये ती पास ऑन होण्याची शक्यता वाढते. जर आईवडिल दोघांमध्ये जेनेटिक कंडिशन असेल तर मुलाला जेनेटिक डिसऑर्डर होण्याची शक्यता 50 टक्क्यांपर्यंत वाढते. अशा स्थितीत पालकांना याविषयी पूर्वीच कल्पना असावी हे आवश्यक आहे.