प. पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांचा पुण्यतिथी गुरूवारी
ओटवणे समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० वा पुण्यतिथी उत्सव गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी होत असुन यानिमित्त समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज हे माणगाव येथील प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनाय गेल्या ५५ वर्षांपासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.
कुडाळकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी ९:३० वाजता प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ वाजता श्री गुरुदत्त प्रसादिक भजनी मंडळ (पुणे), ह भ प अशोक महाराज गुरव आणि श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे यांचे सुश्राव्य भजन व कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता पारंपारिक वारकरी हरिपाठ, सायंकाळी ५ वाजता पारंपारिक पंचपदी नामस्मरण, नामसंकीर्तन, दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी रात्री ८ वाजता ओटवणे कापईवाडी येथील श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ ओटवणे कापईवाडी यांचे सुश्राव्य भजन होणार असून संगीत साथ अक्षय काटाळे (हार्मोनियम), वरद केळुसकर (तबला), अजय केळुसकर आणि तुषार नाईक (मृदंग) यांची आहे.भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड सुरेंद्र माळगावकर आणि डॉ अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.