कॅन्टोन्मेंट हस्तांतरणाबाबत प्राथमिक चर्चा
मंगळवारी पार पडली ऑनलाईन बैठक
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेकडे हस्तांतरण करताना बंगलो एरियासह नागरी वसाहती हस्तांतरित करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीतही जिल्हा प्रशासनाने ही मागणी आग्रहाने मांडली. मात्र, बंगलो एरिया हस्तांतरित करण्यासाठी कोणत्या तांत्रिक अडचणी आहेत, हे कॅन्टोन्मेंट बोर्डने स्पष्ट केले. तब्बल तीन ते चार महिन्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणासंदर्भात बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये दिल्ली, पुणे येथील लष्करी अधिकाऱ्यांसोबत कॅन्टोन्मेंट बोर्ड व जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
नागरी वसाहती हस्तांतरित करण्यास कॅन्टोन्मेंटने यापूर्वीच सहमती दर्शविली आहे. परंतु बंगलो एरियाही हस्तांतरित करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाने केली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीतही हस्तांतरणासाठी करण्यात आलेले सर्व्हे, तसेच एकूण जमीन यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारतर्फे आपली बाजू मांडली. तर कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया कशी पुढे नेली जाईल याची माहिती दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, सीईओ राजीवकुमार यांच्यासह पुणे येथील जेसीओ कार्यालयाचे अधिकारी व दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.