हेस्कॉमकडून वाढीव वीजबिलाचा दणका
भरमसाट वाढ झाल्याने नागरिक हैराण
बेळगाव : राज्य सरकारने ‘गृहज्योती’ योजनेंतर्गत सरासरी 200 युनिट मोफत वीज दिल्याने अनेकांचे वीजबिल शून्य रुपये येत होते. परंतु मागील काही महिन्यांपासून वीजबिलात वाढ होऊ लागली आहे. काही ग्राहकांच्या बिलात वाढ न करता त्यांच्या बिलामध्ये अरीअर्सच्या नावाखाली 1000 ते 1500 रुपयांची वाढ करण्यात आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गृहज्योतीमुळे विजेचे बिल शून्य रुपयांवर आले होते. परंतु वापर वाढत असल्याचे कारण देत हेस्कॉमकडून बिलामध्ये वाढ करण्यात येत आहे. यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या बिलामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आधीच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना आता वीजबिलामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शून्य रुपयांवरून थेट आता 800 ते 900 रुपये वीजबिल येऊ लागल्याने गृहज्योती योजनेचा लाभ बंद झाला का? अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.
नवीन मीटर बसविल्यामुळे नजरचूक...
प्रत्येक महिन्यात 250 ते 300 रुपये विजेचे बिल येते. परंतु या महिन्यात 1924 रुपये बिल देण्यात आले. वास्तविक घरामध्ये सर्व एलईडी बल्ब असताना विजेचा वापर अत्यंत कमी असताना बिल इतके आलेच कसे? याची शहानिशा केल्यानंतर नवीन मीटर बसविल्यामुळे नजरचुकी झाली असून बिल कमी करून देण्यात आले. शहानिशा केली म्हणून बिल कमी झाले अन्यथा संपूर्ण बिल भरावे लागले असते.
- राजू मरवे (नागरिक)