झाड कोसळून गर्भवती महिलेसह मुलीचा मृत्यू
यल्लापूर तालुक्यातील दुर्घटना : तीन मुले गंभीर जखमी : किरकोळ जखमींमध्ये चौघांचा समावेश
कारवार : यल्लापूर तालुक्यातील किरवत्तीजवळच्या डुमगेरी येथे मोठे झाड कोसळून 5 महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार तर उपचाराला नेताना 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. या दुर्घटनेत 3 मुले गंभीर जखमी झाली असून त्यांना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत अन्य चार मुले किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांच्यावर यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. झाड कोसळून ठार झालेल्या महिलेचे नाव सावित्री बाबू खरात (वय 28) व स्वाती बाबू खरात (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. घाटू लक्कू कोरके (वय 5), श्रावणी बाबू खरात (वय 2) आणि शांभवी बाबू खरात (वय 4) ही मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत.
तर किरकोळ जखमी झालेल्या मुलांची नावे सानवी बाबू कोरके (वय 5), विनय लक्कू खरात (वय 5), अनुश्री भांबू कोरके (वय 5) अशी आहेत. यल्लापूर तालुक्यातील डुमगेरी येथील अंगणवाडी इमारतीजवळ मोठे झाड होते. हे झाड अचानक कोसळले. आपल्या मुलांना घरी परत आणण्यासाठी अंगणवाडीकडे गेलेली महिला झाडाखाली सापडून जागीच ठार झाली. यल्लापूरचे पोलीस निरीक्षक रमेश हनापूर, इतर कर्मचाऱ्यांनी व हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य हाती घेतले. गंभीररित्या जखमी झालेल्या मुलांना उपचारासाठी हुबळीला पाठविले व किरकोळ जखमी मुलांना यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच यल्लापूर-मुंदगोडचे आमदार शिवराम हेब्बार यांनी यल्लापूर रुग्णालयाला भेट दिली. घटनेत ठार झालेल्या महिला व मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहे.