गर्भधारणा नसतानाही प्रेग्नंसी फोटोशूट
अपडेटेशनसाठी युवतींकडून अजब प्रकार
चीनमध्ये सोशल मीडियावर सध्या एक अजब ट्रेंड व्हायरल होत आहे, यात युवा, अविवाहित महिला गरोदर नसतानाच नकली पोट परिधान करून मॅटर्निटी फोटोशूट करवून घेत आहेत. या ट्रेंडला प्री-सेट फोटोशूट म्हटले जात आहे, याचा उद्देश जीवनाच्या खास क्षणांना त्यांच्या सर्वोत्तम काळात कैद करणे आहे.
परंतु या ट्रेंडवर काही लोक आक्षेपही घेत आहेत. चिनी संस्कृतीत विवाहाशिवाय आई होणे समाज अन् संस्कृतीच्या विरोधात मानले जाते. परंतु चीनमध्ये हा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होतोय ही देखील वस्तुस्थिती आहे. प्रीमेड मॅटर्निटी फोटोशूट ट्रेंडला हुनान प्रांतातील जेन-जी इन्फ्लुएंसर मेइजी गीगीने नकली बेबी बंपसोबत व्हिडिओ पोस्ट केल्यावर विशेष ओळख मिळाली आहे. जोपर्यंत मी तरुण आहे आणि माझ्याकडे स्लिम फिगर आहे, मी जीवनातील प्रत्येक हिस्स्याला जगू इच्छिते, याचमुळे मी नकली बेबी बंप परिधान करत हे फोटोशूट करविल्याचे मेइजी सांगते.
मेइजीने स्वत:च्या स्लिम आणि यंग लुकसोबत मॅटर्निटी फोटोशूटची छायाचित्रे शेअर केली. जोपर्यंत मी स्लिम आहे, मी नकली पोट परिधान करत मॅटर्निटी फोटोशूट करविले आहे, मी स्वत:च्या चांगल्या मित्रासोबत हे केले असल्याचे तिने नमूद केले आहे.एका अहवालानुसार चीनमध्ये विवाह अन् जन्मदर सातत्याने कमी होत आहे, यामुळे हा ट्रेंड अधिकच चर्चेत आला आहे. 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये चीनमध्ये केवळ 47.5 लाख विवाहांची नोंद झाली आहे.
चिनी महिलांकडून अनुकरण
26 वर्षीय चिनी महिलेने या ट्रेंडबद्दल स्वत:चे मत व्यक्त केले आहे. मी या ट्रेंडचे अनुकरण केले कारण आई होण्याची अनुभूती मला मिळावी आणि माझ्या शरीरावरही याचा परिणाम होऊ नये असे तिचे सांगणे आहे. मी 22 व्या वर्षी अशाप्रकारची छायाचित्रे काढून घेतली आहेत, कारण मी वयाच्या 30 व्या वर्षी चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यावर माझे छायाचित्र तितके सुंदर दिसणार नाही असे एका अन्य महिलेने म्हटले आहे.
चीनचा समाज त्रस्त
हा ट्रेंड लोकप्रिय होण्याचे मोठे कारण महिलांचे जीवन सोशल मीडियाच्या कक्षेत मोठ्या प्रमाणात आले आहे. आता जीवनातील प्रत्येक निर्णय सोशल मीडिया इन्फ्लुएंस होत घेतले जातात. स्वत:च्या प्रत्येक छायाचित्रात परिपूर्ण दिसण्याचा आग्रह त्यांना गरोदरपणासारख्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणालाही परफेक्शनच्या कक्षेत आणत आहेत. तसेच हे करणे सोपे आहे कारण महिलांना केवळ एक नकली बेबी बंपची गरज भासते, कुणाशी विवाह करणे, त्याला आयुष्याचा जोडीदार करणे, मुलांचे पालनपोषण करणे आणि त्याला समाजात राहण्यायोग्य करणे अत्यंत अवघड काम असल्याचे चीनचे सामाजिक तज्ञ सांगत आहेत.
नकली बेबी बंपची ऑनलाइन मागणी
चीनच्या ऑनलाइन मार्केटमध्ये नकली बेबी बंपचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जे तीन महिने, सहा महिने आणि आठ महिन्यांच्या गर्भावस्थेची नक्कल करतात. महिला याच्या मदतीने स्वत:च्या सुंदर मॅटर्निटी फोटो पोस्ट करत आहेत. परंतु हा ट्रेंड टीकेलाही देखील सामोरा जात आहे. हा महिलांमध्ये अवास्तविक सुंदरतेला प्रोत्साह देतो, यामुळे नव्या मातांमध्ये त्यांची प्रतिमा आणि शरीरावरून चिंता वाढू शकते असे तज्ञांचे सांगणे आहे.