अनमोल माती
भारतीय संस्कृतीतील साऱ्या सणावारांची नाळ मातीशी जोडली आहे. संक्रांतीला मातीचे वाण सुवासिनी एकमेकींना देतात. अक्षयतृतीयेला माठ, डेरा यांचे दान करतात. देवीच्या नवरात्रात घट बसतात तेव्हा आधी मातीमध्ये धान्य पेरतात. उगवून आलेल्या धान्याची पूजा करतात. पूर्वी घरोघरी मातीची भांडी असत. त्यात अन्न शिजवणारी चूल मातीची असे. ‘चुलीवरचा स्वयंपाक’ आजच्या काळातही समाजाला आवडतो म्हणून ‘चुलीवरचे अन्न’ अशी खानावळींची जाहिरात होते. पूर्वी उंबरठ्यावरचे माप ओलांडून नववधू घरात आली की तिला घरातील ‘चुलमाय’ दाखवत. माहेरच्या प्रेमळ माणसांसारखेच तिचे अस्तित्व स्त्रियांच्या मनात होते. चूल हे लोककथेमधील एक संरक्षक दैवत आहे. सारवलेली तयार चूल जेव्हा घरात येई तेव्हा तिचे स्वागत थाटामाटात होई. चूल घेऊन येणाऱ्या सासुरवाशीणीचे पाय दूधपाण्याने धुऊन, हळदकुंकू लावून तिला सन्मानाने घरात घ्यायचे. पुरणावरणाचा स्वयंपाक शिजला की पहिला घास चुलीला स्त्रिया देत असत. चूल वृद्ध होऊन तिला तडा गेला की कृतज्ञ भावनेने, श्रद्धेने तिला उतरवून तिची बारीक माती करून अंगणातल्या झुडुपांना आणि वेलींना द्यायची. मातीच्या देहाला जोपासणारी, वाढवणारी मातीची चूल पुन्हा मातीत मिसळून घरादारावर कृपादृष्टी ठेवत असे.
मानवी जीवनाची नश्वरता सांगणारा तो स्मशानघट. घरामधला तेजस्वी अग्नी मडक्यात घालून स्मशानभूमीत घेऊन जातात व त्या अग्नीने मृतदेहावर अग्निसंस्कार करतात. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ‘झाला प्रेतरूप शरीराचा भाव। लक्षीयेला ठाव स्मशानीचा ?’ तुकारामांचा हा साक्षात्कारोत्तर अभंग आहे. त्यात ते म्हणतात, हा देहरूपी घट देवाच्या सभोवती फिरवून चरणांजवळ फोडला आणि मी ब्रह्म आहे अशा बोधाची गर्जना केली. शरीर ज्या पंचमहाभूतांचे होते त्यांना ते अर्पण केले. शरीराची राख झाली व त्या ठिकाणी ‘उजळीला दीप गुरुकृपा.’
मातीचे जीवनाशी गूढ नाते आहे. कारण मातीमध्ये प्राणतत्व आहे. माती हीच समस्त जिवांची जननी आहे. माती असशी मातीत मिळशी असे म्हटलेले आहे. ग. दि. माडगूळकर यांचे अप्रतिम गीत आहे ‘विठ्ठला, तू वेडा कुंभार’. हे परमेश्वरा, तू या मातीतून रोज अनंत जिवांची निर्मिती करतोस. माती, पाणी, उजेड, वारा हा पंचमहाभूतांचा पसारा घेऊन तू निराकार आकाशाला आकार देतोस आणि घटांची उतरंडच रचतोस. त्याला काहीही अंतपार नाही. या मातीच्या देहाचे कर्म जसे असेल त्याप्रमाणे कुणाच्या मुखात लोणी पडते, तर कुणा मुखी अंगार. तुला वाटते तेव्हा तू हा घट क्षणात फोडून टाकतोस. माणसाला काही कळायच्या आत देहाची माती होते.
तैत्तेरीय उपनिषदात म्हटले आहे की सर्व प्रजा अन्नानेच जगतात. वनस्पती मातीतून अन्न घेतात. मातीमध्ये पंचमहाभूते असतात. तीच वनस्पतींचे अन्न होतात. पंचमहाभूतांपासून वनस्पती अन्न घेऊन वाढतात. इंदिराबाई संत एका कवितेत म्हणतात, ‘रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन’. माती माणसाच्या आयुष्याला व्यापून उरते.
माती माणसाला श्वास देते. अन्न देते, पोसते, वाढवते. तरीही एखादी गोष्ट विस्कटली की वाक्प्रचार ओठी येतो ‘सारे मातीमोल झाले.’ काहीही किंमत नाही. खरे तर माती ‘अनमोल’ आहे म्हणून तर बाळकृष्ण यशोदेच्या चोरून माती खातो. कृष्ण जितक्या आवडीने लोणी खातो तेवढ्याच आवडीने मातीसुद्धा खातो. श्रीकृष्णाचे सवंगडी यशोदेच्या सांगण्यावरून कृष्णावर लक्ष ठेवून असतात. एक दिवस सकाळी गोपाळ दाराशी येऊन यशोदेला सांगू लागले, ‘मुले सांगताती । माती खातो गे श्रीपती?’ तुझा नटखट खट्याळ मुलगा माती खातोय. यशोदा चिडून मारायला धावली. कशी? तर, ‘लाकूड घेऊनी हातात, माती खातो का पुसत.’ तिचे हे कोपिष्ट रूप बघून कृष्ण थरथरा कापायला लागला. अर्थात खोटे खोटे. नाटकीच तो. ‘भावा भुलला से खरा। कापत असे थराथरा ?’ यशोदा म्हणाली, ‘मुख दावी उघडूनी। पाहे म्हणे चक्रपाणी।’ श्रीकृष्णाच्या मुखात बघते तर काय, तिथे तिला अनेक ब्रह्मांडे दिसली. यशोदेची स्थिती कशी झाली? तर, ‘ब्रह्मांडे देखिली। नामा म्हणे वेडी झाली।’ त्याच्या मुखातले जग बघून ती देहभान विसरली.
असेच एका अभंगात संत तुकाराम महाराज वर्णन करतात. यशोदा म्हणते, ‘कृष्णा माती खायची नाही. कुठेही माती खाताना दिसलास तर तुझ्या पातळीवर ठेवलेली मुले मला लगेच येऊन सांगतील.’ कुठली बरे मुले? चार वेद, सहा शास्त्रs आणि अठरा पुराणे. कृष्ण मनात म्हणतो, अग, आई तुला ठाऊक नाही तू कुणाला माझ्या पाळतीवर ठेवले आहेस. ते सगळे माझ्या रूपाचे वर्णन कसेबसे करतात. तर तक्रार कशी करणार? एक दिवस काय झाले?
‘जगाचा हा बाप दाखविले माये
माती खाता जाई मारावया
मारावया तिने उगारिली काठी
भुवने त्या पोटी चौदा देखे’
ही चौदा भुवने कृष्णाच्या मुखात बघून तिला कळून चुकले की हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. जगावेगळा आहे. मग काय, कृष्णाने तिला लगेच मायेचे पांघरूण घातले. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मायावंत हरी रूप काय जाणे, माझे माझे म्हणे देवा बाळ’.
श्रीराम लंकेला जाताना अयोध्येची माती बरोबर घेऊन गेले होते. मातीचे माणसावर ऋण असते. मातीचा टिळा, मातीचे स्नान, माती हेच औषध. माती ही पृथ्वीचेच एक रूप. ती समस्त जनांची कुलदेवता आहे. तिची पूजा रोज करायला हवी. मातीशी प्रामाणिक रहा हा कृष्णाचा संदेश आहे.
-स्नेहा शिनखेडे