कोल्ड्रिफ सिरपबाबत राज्यातही खबरदारी
सिरपवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने उचलली पावले : औषधामध्ये भेसळ आढळल्यास होणार कारवाई
बेंगळूर : मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त खोकल्याच्या औषधामुळे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्येही राज्य सरकारने अधिक खबरदारी घेतली आहे. राज्यात कोल्ड्रिफ सिरपचा पुरवठा होत नसला तरी आरोग्य विभागाने या सिरपवर लक्ष ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. या सिरपचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या औषधात काही भेसळ आढळल्यास आरोग्य खात्याने कारवाई करण्याचा पुढाकार घेतला आहे.
राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पालकांना कोणत्याही कारणास्तव कोल्ड्रिफ खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सिरप खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. या खोकल्याच्या औषधात विषारी घटक असल्याची धक्कादायक बातमी उघड झाल्यानंतर राज्यातही या औषधावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
या सिरपचे सेवन केल्यानंतर होणाऱ्या मुलांचा मृत्यू लक्षात घेता तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारने या खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर निर्बंध लादले आहेत. राज्य सरकारने तेलंगणा राज्यालाही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. हे औषध घेतल्यानंतर अन्न सुरक्षा आणि औषध नियामक प्राधिकरणाच्या पथकाने 6 राज्यांमधील 19 उत्पादन केंद्रांना भेट देऊन त्यांची तपासणी केली. या औषधाच्या सेवनाने मूत्रपिंडांसह अनेक अवयव निकामी झाले आहेत. अपस्मार होण्याची शक्मयता देखील आहे. जर हे औषध जास्त प्रमाणात सेवन केले तर मृत्यूचे प्रमाण वाढून मज्जासंस्था देखील निकामी होते. या सर्व कारणांमुळे राज्यात कोल्ड्रिफवर लक्ष ठेवले जात आहे.
औषध कंपन्यांनी या सिरपमध्ये परवानगीपेक्षा अधिक रासायनिक घटकांचा वापर केला आहे. खोकल्याच्या औषधात फक्त 0.10 टक्के डायथिलीन ग्लायकॉल वापरण्यास परवानगी आहे. सदर रासायनिक वापर न केलेले औषध अधिक सुरक्षित आहे, असे अनेक देश मानतात. सिरपला गोड चव देण्यासह ते घट्ट होऊ नये, यासाठी या रासायनिकचा वापर केला जातो. तथापि, मोठ्या प्रमाणात या रसायनाचे सेवन केल्यानंतर मुलांना आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
खोकला औषधांच्या उत्पादन युनिट्सची होणार तपासणी
राज्यातील खोकला निवारण औषधांच्या उत्पादन युनिट्सची तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कर्नाटक हे देशातील सर्वात मोठे औषध उत्पादक आहे. खोकला निवारण सिरपच्या वापरामुळे मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा सरकारने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. कर्नाटकमध्ये प्रथम उत्पादन युनिट्सची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.