Satara Shivtirth: 'शिवतीर्था'वर 'प्री वेडिंग शूट', पावित्र्य भंग कराल तर याद राखा..., शिवप्रेमींचा इशारा
शेकडो शिवभक्तांनी संताप व्यक्त करत शिवतीर्थाचे पावित्र्य भंग कराल तर याद राखा असा इशारा दिला
By : दीपक प्रभावळकर
सातारा : मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी साताऱ्यातील मानबिंदू म्हणजे 'शिवतीर्थ' या 'शिवतीर्था'च्या जपणुकीसाठी आणि सन्मानासाठी शिव-शंभू भक्तांनी गेली 20 वर्षे दिलेल्या लढ्याला नुकतेच यश आले. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी थेट शिवतीर्थावर 'प्री वेडिंग शूट' करण्यात आले. काहींनी विरोध करताच ‘आम्ही भाड्याची पावती दिली आहे’, असे सांगून शूट पुढे दामटण्यात आले. साताऱ्याच्या काळजावरचा हा घाव सारे डोळ्यादेखत पाहत होते.
दरम्यान, ही भाड्याची पावती देणारे कोण? नगरपालिका?, पोलीस?, जिल्हापरिषद? राज्यशासन? यात कोण 'शिवतीर्थ' भाड्याने देणार आहे? असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. या प्रश्नी पालिका मुख्याधिकारी 'अभिजीत बापट' यांच्या दालनात सोमवारी 11 वाजता जाब विचारण्यासाठी शिवभक्तांनी जमावे, असेही आवाहन करण्यात आले. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची सातारा ही शेवटची राजधानी. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेले भारतातील हे एकमेव शहर. 350 वर्षातील शहाजीराजेंपासून कित्येक पिढ्यांच्या पाऊलखुणा या भूमीत उमटल्या आहेत. त्यामुळे साताऱ्याचे महत्व अद्भूत आणि विलक्षण आहे.
'पोवईनाका' नव्हे 'शिवतीर्थ' साताऱ्याचा मानबिंदू
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धसुज्ज मूर्ती ही हिंदूस्थानातील आहे. या मूर्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या परिसराला 'शिवतीर्थ' संबोधले जावू लागल्याने याची मालकी असलेल्या जिल्हा परिषदेने तसा ठरावही केला आहे. शिवतीर्थाचे पावित्र्य राखले जावे म्हणून गेल्या 20 वर्षात अनेक आंदोलने झाली. त्यामुळे हा परिसर देशातील पहिला फ्लेक्समुक्त परिसर झाला. न्यायालयानेही तसे आदेश दिलेले आहेत. तसेच या परिसरात गुलालबंदी आणि फटाकेबंदीही करण्यात आली आहे.
शुक्रवार, शनिवार प्रचंड संतापाचा
शुक्रवारी सकाळी हिंदूस्थानासाठी आराध्य असलेल्या 'शिवतीर्थावर' प्री वेडिंग शूट सुरू होते. या शूटदरम्यान शिवरायांना वंदन करण्यासाठी आलेल्यांना दूर लोटण्यात आले. संतापजनक प्रकाराची साताऱ्यात वंद्यता झाल्यामुळे अनेकांनी हा प्रकार रोखला. दरम्यान, शनिवारी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. सवयीप्रमाणे वंदन करण्यासाठी आलेल्या भक्तांना बाहेर थांबून पुन्हा नव्याने प्री वेडिंग शूट सुरू झाले.शनिवारी काहींनी या प्रकाराला रोखण्याचा प्रकार केला असता व्हिडीओग्राफी टीमने संबंधितांना आम्ही ‘भाड्याची पावती दिली आहे’, असे सांगताच सातारकरांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.
भाडे खाणारी 'ही' कोणती संस्था?
सातारा 'शिवतीर्थ' हा विषय अनेकांनी जटील करून ठेवला आहे. मालकी जिल्हा परिषदेची, सध्या काम सुरू आहे पालिकेचे, निधी खर्च होतोय राज्यशासनाचा आणि जबाबदारी शहर पोलिसांची. अशा वेळेला प्री वेडिंग शूट करण्याला परवानगी देणारी ही ‘भाडखाऊ’ संस्था कोण? हे शोधण्याचे काम सुरू झालंय.
औंध संस्थांनने बंदी आणली, अतिक्रमण साताऱ्यावर का?
सातारा आणि परिसर हा प्री वेडिंग शूटसाठी कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. इथे प्री वेडिंगसाठी 10 ते 15 लाखांपर्यंतच्या सुपाऱ्या घेतल्याचे अनेकांना ज्ञात आहे. या शूटमध्ये कास, ठोसेघर, बामणोली सह माहुलीच्या काशी विश्वेश्वर मंदिराला महत्व होते. मंदिर निवासस्थानाची पावती फाडून काशी विश्वेश्वराच्या प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी गेल्याच महिन्यात या प्री वेडिंग शुटवर कडक निर्बंध लावले. जणू या प्रतिबंधाचे अतिक्रमण 'शिवतीर्था'वर झाले की काय?
यापुढे पावित्र्य भंग कराल तर याद राखा...
घडल्या प्रकाराची ‘तरुण भारत’ने शुक्रवार आणि शनिवार आगपाखड न करता पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेकडो शिवभक्तांनी संताप व्यक्त करत शिवतीर्थाचे पावित्र्य भंग कराल तर याद राखा असा इशारा दिला आहे.
दाम्पंत्यांनो शिव आर्शीवाद घ्या, पावित्र्य भंग नको
शुक्रवार आणि शनिवारी झालेला प्रकार हा 'शिवतीर्था'चा अवमान करण्यासाठी झाला असेल असे नाही. तेही शिवभक्त असतील, यापुढेही युद्धसुज्ज शिवरायांचा आशीर्वाद साऱ्यांनीच घ्यावा. त्यांच्या भावना शुद्ध असतील मात्र त्या 'शिवतीर्था'चे पावित्र्य भंग करत आहेत. त्यामुळे प्री वेडिंगची नौटंकी न करता दाम्पत्याने शिव आशीर्वाद घ्यावेत अशी सातारकरांची प्राजंळ मान्यता आहे.