पूर्व भागात पेरणीपूर्व मशागतीला वेग
धूळवाफ पेरणीला लवकर होणार सुऊवात : अनुकूल वातावरण असल्याने शेतकरी कामात मग्न
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वळिवाचा दमदार पाऊस झाल्याने सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे धूळवाफ पेरणीलाही लवकर सुऊवात होण्याचा अंदाज आहे. बसवण कुडची, निलजी, मुतगा, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, चंदगड, अष्टे, मुचंडी, कलखांब, कणबर्गी आदी परिसरामध्ये मागील काही दिवसांमध्ये वळिवाचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे सध्या पेरणीपूर्व मशागतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने शेतकरी वर्ग शिवारात कामामध्ये मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मशागत करणे, बांध बांधणे आदी कामे जोरात सुरू आहेत. शेतकरी वर्ग बैलजोडी, ट्रॅक्टर, पावर टिलर आदी यंत्राद्वारे पूर्व मशागतीची कामे करून घेत आहेत. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळवाफ पेरणी केली जाते. सध्या काही शेतकऱ्यांनी धुळवाफ पेरणीलाही प्रारंभ केला असला तरी येत्या काही दिवसानी पेरणीला जोर येण्याची शक्यता आहे
भाजीपाला पिकेही जोमात
या भागामध्ये मिरची, कोथिंबीर पिके घेतली जाणारी महत्त्वाची पिके आहेत. त्याचबरोबर फ्लावर, कोबी, वांगी, टोमॅटो, भेंडी, काकडी, दुधी भोपळा, मेथी, शेपू ही पिके ही मोठ्या प्रमाणावर पिकविली जातात. सध्या भाजीपाला पिकांना चांगला दर असल्याने शेतकरी भाजीपाला पिके पिकवण्यात गुंतले आहेत.
भूजल पातळीत काहीशी वाढ
वळिवाच्या पावसाने भूजल पातळीमध्ये काहीशी वाढ झाली आहे. पावसापूर्वी या भागामध्ये विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला होता. त्यामुळे पिकांना पाणी सोडणे मुश्कील होऊन बसले होते. काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती.
ऊसपीक बहरले
पूर्व भागामध्ये ऊसपीक ही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी ऊस लागवडीमध्ये वाढ झाली आहे. वळीव पावसामुळे या भागातील ऊसपीक बहरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे.
मशागत कामांना चालना
या भागामध्ये वळीव पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना चालना मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये धूळवाफ पेरणीला जोरात सुऊवात होणार आहे.
- अपय्या हुलमणी, शेतकरी अष्टे
भाजीपाला पिकांना चांगला दर
या भागामध्ये भाजीपाला पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या भागांमध्ये कूपनलिकांची संख्या जास्त आहे. कूपनलिकाद्वारे पिकांना पाणी सोडले जाते. या भागामध्ये कोथिंबीर मिरची आदी पिके बहरात आली आहेत. सध्या भाजीपाला पिकांना चांगला दर असल्याने शेतकरी वर्ग विविध भाजीपाला पिके घेत आहेत.
- सदानंद पाटील, शेतकरी अष्टे