‘मान्सून पूर्व’चा सर्जिकल स्ट्राईक
कसबा बीड / विश्वनाथ मोरे :
पावसाळा सुरू होण्यापुर्वी मे महिन्यामध्ये वळीव पावसाची हजेरी नेहमीचीच असायची. पण यावर्षी वेळेअगोदर समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अवकाळी पावसाने सर्जिकल स्ट्राइक केला आहे. यामध्ये शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
अवकाळी वळीव पावसामुळे करवीर पश्चिम भागामध्ये पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड, शिरोली दुमाला, चाफोडी भागांमध्ये शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. पेरणीच्या अगोदर असणारी पिके यामध्ये विशेष करून सूर्यफूल, भुईमूग, मका पिके पावसामुळे काढायची राहून गेली आहेत. आणि काही शेतकऱ्यांनी काढलेले आहेत पण त्यांना वाळवण्यासाठी काय करायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मृग नक्षत्रावर पेरणी करायची, या हेतूने सर्व शेतकरी आपली पिके काढायची आणि ती वाळवायची व साठवण करायची, या हेतूने थांबले होते त्यांच्या या सर्व नियोजनावर पावसाने पाणीच पाणी करून ठेवले आहे.
वीट भट्टी व्यावसायिक या पावसामुळे अत्यंत अडचणीत आले आहेत. मान्सूनपूर्व पावसाची गेली दोन दिवस रिपरिप राहिली आहे. त्यामुळे ओढे-नाले भरुन वाहू लागले आहेत. रस्त्यांना तर ओढ्याचे स्वरुप आले आहेत. केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे. 25 मेच्या दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी 8 ते 10 दिवस अगोदर मान्सून दाखल होत आहे. त्यामुळे मशागतीसाठी पाऊस उघडणार का, यंदाची पेरणी होणार का, अशा प्रश्नांनी शेतकरी भांबावून गेला आहे. 16 वर्षांपूर्वी 2009 ला या पद्धतीनेच मान्सून वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला होता. आता 16 वर्षात पहिल्यांदाच मान्सून वेळेआधी दाखल होत आहे. त्यामुळे 16 वर्षात पहिल्यांदा पाऊस आहे, या परिस्थितीमध्ये जोर असाच राहिला तर शेतकरी अडचणीत येणार आहे.
- शेतकरी हकनाक बळी
वीस गुंठ्यामध्ये सूर्यफूल पीक आहे. चार दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वीस गुंठ्यातील सूर्यफूल शेतामध्येच आहे. त्या स्थितीत राहिल्यामुळे ते कापायचे की फेकून द्यायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या पावसाळी हल्ल्यामध्ये शेतकरी हकनाक बळी जात आहे.
- कृष्णात यादव, शेतकरी, कोगे
- वीट व्यवसाय अडचणीत
वीट व्यवसाय असून गेली अनेक वर्षे हा व्यवसाय करत आहे. पण यावर्षी वेळेआधी आलेल्या पावसाने वीट व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे. मजुरांनी तयार केलेल्या विटा आणि वीटभट्टीचा आवा लावण्यासाठी खूपच अडचणी येत आहेत. बँकेच्या व इतर कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये ही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे हा व्यवसाय करताना मेटाकुटीला आलो आहे.
-संतोष पाटील, वीट व्यावसायिक कोगे, महे